हळदी कुंकू कार्यक्रमाचे राजकियकरण
हळदी कुंकू कार्यक्रमाचे राजकियकरण
महिलांचा हळदी कुंकू समारंभ हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. विशेषतः मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकू समारंभ मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. या निमित्ताने महिला आपले दुःख विसरून एकत्र येतात. वान म्हणून एकमेकांना भेटवस्तू देतात. या निमित्ताने विविध सामाजिक संदेश दिला जातो. पण हल्ली हळदी कुंकू समारंभ देखील इतर सणांप्रमाणेच इव्हेंट बनला आहे. अलीकडे तर या सार्वजनिक हळदी कुंकू समारंभाचे पेवच फुटले आहे. विशेषतः यातले ९० टक्के हळदी कुंकू समारंभ हे राजकीय स्वरुपाचे किंवा त्या हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येते. ज्या शहरात किंवा गावात निवडणुका असतात तिथे तर हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. स्थानिक नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य असे कार्यक्रम करण्यात अग्रेसर असतात. यावर्षी ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यामुळे प्रत्येक गावात आणि शहरात हळदी कुंकू समारंभ आयोजित केले जात आहेत. या निमित्ताने उपस्थित महिलांना भेटवस्तूंचे वाटप राजकिय नेते करत आहेत. हळदी कुंकू समारंभ हे एकप्रकारे राजकीय शक्ती प्रदर्शनाचे आणि प्रचाराचे माध्यम बनत आहे. राजकीय नेत्यांनी आयोजित केलेले हळदी कुंकू समारंभ हे महिला मतदारांना आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी आयोजित केले जातात. एरव्ही या महिलांना कोणी विचारतही नाही. आज ज्याप्रमाणे राजकीय नेत्यांनी दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव यासारख्या सार्वजनिक उत्सवात अतिक्रमण करून या उत्सवांचा इव्हेंट बनवला आहे. त्याचीच पुनरावृत्ती हळदी कुंकू समारंभात होताना दिसत आहे. निखळ, कौटुंबिक आणि सांस्कृतिक स्वरूपातील या कार्यक्रमाचा नवरात्र, गणेशोत्सव व नवरात्र उत्सव यासारखा राजकीय आणि बाजारू वापर केला जात आहे. राजकीय नेते यातून आपला राजकीय मतलब साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीय नेत्यांनी महिला मतदारांना आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी हळदी कुंकू समारंभाचा वापर करण्याऐवजी महिलांचे प्रश्न सोडवावेत म्हणजे राजकीय नेत्यांना अशा सार्वजनिक कार्यक्रमाचा वापर करण्याची गरज पडणार नाही आणि हळदी कुंकू सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अवमूल्यन देखील होणार नाही.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0