( राष्ट्रीय युवा दिन १२ जानेवारी निमित्त विशेष लेख )
( राष्ट्रीय युवा दिन १२ जानेवारी निमित्त विशेष लेख )
जगातील सर्वात तरुण जन देश जर कोणता असेल तर तो आपला भारत देश आहे. आज आपल्या देशाची लोकसंख्या १४४ कोटी इतकी आहे. आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकसंख्या ही १८ ते ४० या वयोगटातील आहे. या तरुणांमध्ये खूप ऊर्जा आहे. देशाचे भविष्य याच तरुणांवर अवलंबून आहे. याच तरुणांच्या जोरावर आपण महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहोत. माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचा तर तरुणांवर खूप विश्वास होता. तरुणच आपल्या देशाचे भाग्यविधाते आहेत असे ते म्हणत. या तरुणांकडे असलेल्या ऊर्जेचा उपयोग देशकार्यासाठी करुन घ्यावा असे त्यांचे मत होते. पण आज तरुणांसमोर अनेक आव्हाने आहेत. सर्वात मोठे आव्हान आहे ते बेरोजगारीचे. आजचे तरुण उच्चविद्याविभूषित आहेत. हुशार आहेत. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, साहित्य अशा सर्वच क्षेत्रात आजचे तरुण अग्रेसर आहेत. देशासाठी काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द त्यांच्याकडे आहे. शिक्षण आणि काम करण्याची उर्मी असूनही त्यांच्या हाताला रोजगार नाही. पदव्यांचे भेंडोळे घेऊन तरुण जागोजागी फिरत आहेत मात्र त्यांना नोकरी मिळत नाही. सरकारी नोकर भरती बंद आहे. खाजगी क्षेत्रात नोकरी मिळत नाही. ज्यांना आहे त्यांना नोकरी टिकवणे मुश्किल झाले आहे. स्वतःचा व्यवसाय, उद्योग करायचा म्हटले तर भांडवल नाही. शेतीही बेभरवशाची झाली आहे त्यामुळे आजचे तरुण हताश झाले आहेत. या हताश तरुणांना धीर देऊन त्यांना रोजगार देण्याऐवजी राजकीय नेते त्यांना पकोडे विका असे म्हणून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. रोजगार नसल्याने तरुणांमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे. नैराश्यातून काही तरुणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे तर काही तरुण व्यसनांच्या आहारी गेले आहेत. ज्या तरुणांच्या जोरावर आपण महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहोत तोच तरुण रोजगार नसल्याने आपले जीवन अकाली संपवत आहे तर काही तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत हे पाहून मन खिन्न होते. रोजगार मिळत नसल्याने तरुणांच्या मनात व्यवस्थेविरुद्ध सुप्त असंतोष आहे. या असंतोषाचा भडका होण्याआधीच सरकारने तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी ठोस धोरण आखावे. जर या तरुणांच्या मनातील असंतोषाचा भडका झाला तर भल्याभल्यांना पळता भुई थोडी होईल. सध्याच्या बेरोजगारीचा दर हा मागील ४५ वर्षातील सर्वात जास्त आहे ही बाब आपल्या देशाला भूषणावह नाही. हा दर कमी करण्यासाठी आणि तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार काही ठोस प्रयत्नही करताना दिसत नाही. या तरुणाईचा वापर केवळ मते मिळवण्यासाठीच केला जात आहे असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. तरुणांच्या हाताला काम मिळणे ही काळाची गरज आहे कारण तरुणांच्या हाताला काम मिळाले नाही तर तरुणाई भरकटण्याची शक्यता अधिक आहे. त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्यातील ऊर्जेचा समाजाला, देशाला उपयोग होण्याऐवजी ती ऊर्जा वाया जाण्याचीच शक्यता अधिक आहे. या तरुणांच्या शिक्षणाचा व ऊर्जेचा देशकार्यासाठी उपयोग व्हायला हवा. त्यांचा उपयोग जर देशकार्यासाठी झाला तर आपल्याला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आजची तरुणाई हीच आपली शक्ती आहे. या शक्तीचा वापर व्हायला हवा. जगात सर्वात जास्त तरुण भारतात आहे. जगात चिननंतर सर्वात जास्त लोकसंख्या भारतात आहे. खरंतर याला समस्या न मानता संधी मानली पाहिजे. या संधीचे सोने करुन तरुणांच्या हाताला रोजगार दिल्यास भारत महासत्ता बनेल यात शंका नाही. आजच्या तरुणांना जग सुंदर शांत असावे असे वाटते. गरिबी, भ्रष्टाचार त्यांना नको आहे. प्रजासत्ताक राष्ट्रावर त्यांची निष्ठा आहे. आपण समोरच्याला समजून न घेता त्याचा दुस्वास कसा करू शकतो? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे ते सतत प्रयत्न करीत असतात. त्यांना एक स्थिर व सुरक्षित अर्थव्यवस्था हवी आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसराबाबत ते तितकेच जागृत असतात.संपत्ती कधीतरी संपून जाईल त्यामुळे तिचा जपून वापर करण्यास ते प्राधान्य देतात. थोडक्यात सांगायचे तर आजचा तरुण जबाबदार आहे. तो आपल्या शिक्षणाकडे गांभीर्याने पाहत आहे. याचवेळी पैशापेक्षा आनंद महत्वाचा असल्यामुळे तो आपल्या आवडीनुसार करियर निवडण्यास प्राधान्य देतोय त्यामुळे आपण जे काही काम करीत आहे त्यासाठी लोकांनी आपल्याकडे मानाने पहावे अशी त्यांची इच्छा आहे. आपल्या देशातील ६९ टक्के तरुणांना ठाम विश्वास आहे की पैसे त्यांच्यासाठी आनंद विकत आणू शकत नाही तर ८० टक्के तरुणांना पैशापेक्षा कला, ७९ टक्के तरुणांना पैशापेक्षा शिक्षण आणि ७६ टक्के तरुणांना पैशापेक्षा यश महत्वाचे वाटते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0