बॉलिवूडचे पाहिले सुपरस्टार राजेश खन्ना
बॉलिवूडचे पाहिले सुपरस्टार राजेश खन्ना
हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांचा आज जन्मदिन. राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. राजेश खन्ना यांचे मूळ नाव जतीन खन्ना असे होते. त्यांच्या आईचे नाव चंद्राणी खन्ना तर वडिलांचे नाव लाला हिराणी असे होते. त्यांचे वडील शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकांना मुलबाळ नव्हते म्हणून त्यांच्या आई वडिलांनी त्यांना त्या नातेवाईकांकडे दत्तक दिले. त्यांच्या नवीन आईचे नाव लीलावती खन्ना तर वडिलांचे नाव चुनीलाल खन्ना असे होते. चुनीलाल खन्ना रेल्वे कंत्राटदार होते. ते मुंबईत राहत होते. राजेश खन्ना हे सेंट साबिस्टाईन गॉन हायस्कूल येथे शिकत असताना त्यांची रवी कपूर यांच्याशी ओळख झाली. रवी कपूर म्हणजेच हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र. राजेश खन्ना व जितेंद्र यांनी कॉलेज जीवनात अनेक नाटकात एकत्र काम केले. नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी राजेश खन्ना हे पुण्यात आले. पुण्यात दोन वर्ष शिक्षण घेतल्यावर ते पुन्हा मुंबईला परतले. मुंबईत काही दिग्दर्शकांनी टॅलेंट हंट स्पर्धा आयोजित केली. राजेश खन्ना यांच्या काकांनी त्यांचे नाव या स्पर्धेकरिता नोंदवले. ते नोंदवताना त्यांनी त्यांचे नाव जतीन खन्ना ऐवजी राजेश खन्ना म्हणून नोंदवले पुढे याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. या स्पर्धेत त्यांनी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले त्यांच्या अभिनयाने त्याकाळातील दिग्गज दिग्दर्शक प्रभावित झाले. १९६६ साली चेतन आनंद यांनी त्यांना आखरी खत या चित्रपटात संधी दिली हाच त्यांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट ऑस्करला गेला होता. पहिल्याच चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने चित्रपट रसिक तसेच जाणकार प्रभावित झाले त्यामुळे त्यांना अनेक चित्रपट मिळाले. त्याकाळातील यशस्वी दिग्दर्शक असणारे शक्ती सामंत यांनी त्यांना आराधना या चित्रपटात नायकाची भूमिका दिली. या चित्रपटात शर्मिला टागोर या त्यांच्या नायिका होत्या. चित्रपट सुपरहिट झाला. या चित्रपटातील सर्व गाणी लोकप्रिय झाली. या चित्रपटा नंतरच राजेश खन्ना सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. राजेश खन्ना यांची अदाकारी, संवाद फेकीची लकब यावर तरुणाई फिदा झाली. विशेषतः कॉलेज मधील मुली त्यांच्यावर जीव ओवाळून टाकू लागल्या. त्यांचे चाहते त्यांच्या गाडीचे चुंबन घ्यायचे. मुली त्यांच्या गाडीची धूळ आपल्या भांगेत भरत. बऱ्याचश्या मुलींनी त्यांच्या फोटोशी लग्न केले होते. त्यांना चाहत्यांचे जितके प्रेम लाभले तितके प्रेम कोणत्याच कलाकाराला लाभले नाही. राजेश खन्ना यांचे सलग १५ चित्रपट सुपरहिट झाले हा एक विक्रम आहे. तो अजूनही कोणत्या अभिनेत्याला तोडता आला नाही. शर्मिला टागोर, मुमताज, अशा पारेख, तनुजा यांच्याशी त्यांची चांगली केमिस्ट्री जमली. सत्तरच्या दशकात राजेश खन्ना सुपरस्टार पदावर आरूढ झाले होते. चालण्या बोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत, हातवारे करत नाचण्याची अनोखी शैली, जबरदस्त संवाद फेक आणि ओठावर रुंजी घालतील अशी गाणी यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसायन बनून गेले. त्याकाळात सर्वाधिक मानधन घेणारे राजेश खन्ना यांची प्रेम प्रकरणेही गाजली पण १९७३ साली त्यांनी आपल्या पेक्षा कितीतरी लहान वयाच्या डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला. १९९२ साली काँग्रेसच्या वतीने त्यांनी दिल्ली मतदार संघातून लोकसभेची पोटनिवडणुक लढवली आणि ते खासदार म्हणून निवडून आले. १८ जुलै २०१२ रोजी राजेश खन्ना यांनी चाहत्यांना अलविदा म्हणत जगाचा निरोप घेतला आणि बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार काळाच्या पडद्याआड गेला.
"बाबूमोशाय....... बाबू मोशाय जिंदगी और मौत उपरवाले के हात है जहाँपणा...जिसे ना तो आप बदल सकते है ना मै.... हम सब तो रंगमंच की कटपुतलीया है, जीसकी डोर उपरवालेकी उंगलीओमे बंधी है....कब कोण कैसे उठेगा कोई बता नहीं सकता....." आनंद कभी मरते नहीं वह हमेशा याद रहते है.... we all miss you.....
राजेश खन्ना यांना विनम्र अभिवादन!
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0