पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात तालिबानचे सरकार
पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात तालिबानचे सरकार
भारताशी समोरासमोर युद्ध करणे शक्य नसल्याने पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालून भारतात अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला. विशेषतः जम्मू काश्मीर मध्ये त्यांनी दहशतवाद्यांना हाताशी धरून जम्मू काश्मीर कायम अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. भारताशी लढण्यासाठी ज्या दहशतवादाचा पाकिस्तानने शस्त्र म्हणून वापर केला तेच दहशतवादाचे शस्त्र आता त्यांच्यावर बुमरांग होत आहे. तालिबान ही दहशतवादी संघटना आहे हे सर्व जगाने मान्य केले आहे. ज्या वेळी तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला त्यावेळी जगातील बहुतेक देशांनी तालिबानच्या सरकारला मान्यता देण्यास नकार दिला मात्र पाकिस्तानने तालिबानला सुरवातीपासूनच समर्थन दिले. अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारला मान्यता देणारा पाकिस्तान हा जगातील पहिला देश होता अर्थात त्यामागे त्यांचा वेगळा डाव होता. तालिबानला मान्यता दिल्यास तालिबानला सोबत घेऊन भारतात घुसखोरी करून भारतात अस्थिरता माजवता येईल तसेच जर भविष्यात भारताविरुद्ध लढाई झाली तर त्यात तालिबानची मदत घेता येईल हा पाकिस्तानचा डाव होता. आज मात्र त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला असून तालिबानने भारताशी पंगा न घेता पाकिस्तानशीच पंगा घेत पाकिस्तानातच घुसखोरी सुरू केली. मागील वर्षी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तालिबानने पाकिस्तानी हद्दीत प्रवेश करून पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील एका जिल्ह्यात सरकार स्थापन केले होते. याची कबुली खैबर पखतूनच्या राज्यपालांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली होती. पाकिस्तानच्या हातून हा भाग निघून गेल्याने पाकिस्तानमध्ये खळबळ माजली होती. हा होता या दोन्ही देशातील तणावाचा पहिला अंक. आता दोन्ही देशातील तणावाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ले करून २ डझनाहून अधिक तालीबानिंना ठार केले. पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्याला तालिबानने ही जशास तसे उत्तर दिले. अफगाणिस्तानने पाक अफगाण सीमेवर तैनात असलेल्या १९ पाकिस्तानी रेंजर्सला ठार केले इतकेच नाही तर अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या २ चौक्यांवर देखील ताबा मिळवला. यावरून हे स्पष्ट झाले की आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. हा संघर्ष नजीकच्या काळात थांबेल असे वाटत नाही उलट वाढतच जाईल. पाकिस्तानने अफगाणिस्तानला कमी लेखून मोठी चूक केली आहे. पाकिस्तानकडे अत्याधुनिक शस्त्रसाठा आणि अफगाणिस्तानपेक्षा कैक पट अधिक सैन्य आहे. अफगाणिस्तानकडे आजही जुनेच शस्त्र असून त्यांची सैन्य संख्याही कमी आहे असे असले तरी तालिबानी सैन्याकडे जी जिद्द आहे ती पाकिस्तानी सैन्याकडे नाही. तालिबानी चिवट आणि लढाऊ आहेत. त्यांनी याआधी रशिया आणि अमेरिकेलाही चिवट झुंज दिली आहे त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला गुडघे टेकवायला लावले तर आश्चर्य वाटायला नको. वास्तविक अफगाणिस्तानात जेंव्हा तालिबानचे सरकार आले तेंव्हा दोन्ही देशात सौहार्दाचे वातावरण होते मात्र अल कायदाचा मोठा दहशतवादी अल जवाहिरी पाकिस्तानात मारला गेला. अमेरिकेने त्याला पाकिस्तानात घुसून मारले. या सर्व कारवाईत पाकिस्तानने अमेरिकेला मदत केली असा आरोप तालिबानने केला आणि तेथून या दोन्ही देशातील संबंध बिघडले. त्यात पाकिस्तानने पाकिस्तानात राहणाऱ्या अफगाणिस्तानी नागरिकांना देशातून हाकलण्यास सुरवात केल्याने हा तणाव आणखी वाढला आता तर हा तणाव पराकोटीचा वाढला आहे. भारताचा काश्मीर प्रांत बळकावण्यासाठी तालिबानचा वापर करता येईल असे पाकिस्तानला वाटले होते त्याच तालिबानने आता पाकिस्तानचाच भूभाग बळकावून पाकिस्तानला चांगलेच तोंडघशी पाडले आहे. भारतासाठी खणलेल्या खड्ड्यात पाकिस्तानच गाढला जाऊ लागला आहे यालाच म्हणतात जैसी करणी वैसी भरणी!
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0