जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाची भूमिका
जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाची भूमिका
पावसाळा सरता झाला की अनेक ठिकाणी साहित्य संमेलनाचा घाट घातला जातो. विशेषत: ग्रामीण साहित्य संमेलने मराठी भाषा प्रदेशात भरत असलेली दिसताहेत. आजच्या काळात छोट्या मोठ्या ग्रामीण साहित्य संमेलनाची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. साधारणतः ग्रामीण लोकांचे जीवन मागासलेले असते अशी आपली धारणा असते. काहींच्या बाबतीत ती चुकीची ठरु शकेल. भारत देश अधिकतम गावखेड्यातच पसरलेला आहे. खेडी ग्लोबल होत असली तरी विकासाच्या समस्या कायमच आहेत. अनेक योजना राबविल्या जात असतांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्णपणे थांबल्या आहेत असे ठामपणे म्हणता येत नाही. कष्टकरी मजुरांचे जीवनमान तुलनेने सुधारले आहे की गावपातळीवरील समस्यांतच ते गुरफटून पडलेले आहे, याचाही विचार होणे आवश्यक आहे. गावखेड्यातील शिक्षणाबाबतची अनास्था, बालविवाहांचे वाढते प्रमाण, महिलांची स्थिती, अंधश्रद्धेचा फैलाव, खुळ्या समजुती, वाढती बेरोजगारी, तोट्यातच चाललेली शेती, मजुरांचे मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर, हाताला काम मिळण्यासाठी उद्योगधंद्यांसाठीची राजकीय अनास्था, ग्राम जीवनातील शोषणाच्या स्रोतांचे निर्मूलन आणि त्यात येणारे अडथळे, जातीव्यवस्थेचे दुष्परिणाम, धार्मिक ध्रुवीकरण अनेक सोयीसुविधांच्या अभावग्रस्ततेचे हे जीवन या आणि अशा अनेक कारणांमुळे ग्रामजीवनासंबंधीचे तात्विक चिंतन या संमेलनाच्या विचारपिठावरुन व्हावे यासाठीही ही संमेलने अधिक महत्त्वाची आहेत. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात खऱ्या अर्थाने संवाद हरवत चालला असल्याने ग्रामीण जीवनातील मनमोकळेपणा, आपुलकी, जिव्हाळा, एकमेकांसंबंधीची प्रेमभावना, एकत्र राहण्या बोलण्या वागण्याच्या अभावामुळे लोकांमधील निर्माण होणाऱ्या एकत्वाची भावनाही लोप पावत चालली आहे. माणसाला संवादाची अत्यंत आवश्यकता असते. माणसाला माणसाच्या सहवासाशिवाय रानटीपण प्राप्त होते. मानवी जीवनात समता, स्वातंत्र्य, बंधुता, ऐक्यता, न्याय व कारुण्य प्रस्थापित होऊन ग्रामजीवनाला मानवतेचे उच्चतम सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त होऊन सामाजिक पुनर्रचनेचा नवा जन्म होत रहावा यासाठी गेल्या चार वर्षांपासून सप्तरंगी साहित्य मंडळाच्या माध्यमातून आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे.
सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने पहिले जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन हे कंधार तालुक्यातील गोणार या गावी कोणत्याही अनुदानाशिवाय आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील साहित्य संमेलने ही स्वबळावर घेतली जातात. या संमेलनासाठी कोणताही निधी उपलब्ध होत नाही. अखिल भारतीय स्तरावर ज्या पद्धतीने लाखो रुपये महाराष्ट्र शासनाकडून दिले जातात तसेच ग्रामीण भागातील साहित्य संमेलने भरवण्यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेच्या ( डीपीडीसीच्या) माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन तत्कालीन नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले होते. ते संमेलनाचे उद्घाटक होते. यावेळी बोलतांना खा. चिखलीकर म्हणाले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे तिगाडी सरकार साहित्य कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रासह अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठ्यांचे आरक्षण तर गेलेच आहे तर ओबीसींचे आरक्षणही संपुष्टात आले आहे. सरकारमध्ये एकाचा ताळमेळ एकाला नाही. शेतकऱ्यांचा पीक विमा मिळालेला नाही, बेरोजगारी वाढत चालली आहे, उद्योगांना प्रोत्साहन नाही, शेतकरी शेतमजूरांचे प्रश्न कायम आहेत. मुख्यमंत्री तर कुठे आहेत असे विचारले तर कुणीही सांगेल की आम्ही त्यांना कधीही पाहिले नाही. उंटावरून शेळ्या हाकणारे हे सरकार महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या काहीच कामाचे नाही अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली. संमेलनाध्यक्ष अनुरत्न वाघमारे म्हणाले की, माणसा माणसांत सुसंवाद निर्माण झाला पाहिजे. गैरसमजातून विसंवाद निर्माण होतो तो सामाजिक ऐक्यासाठीही बाधक ठरतो. लिहित्या हातांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच विविध संमेलनांपासून वंचित राहणाऱ्या माझ्यासारख्या साहित्यिकांना संधी दिली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वागताध्यक्ष मधुकर महाराज बारुळकर यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाला मिळणाऱ्या निधीत कपात करुन काही हिस्सा ग्रामीण साहित्य संमेलनाला देण्यात यावा अशी मागणी केली. परंतु योगायोग असा की, दुसऱ्याच वर्षी पासून अशी साहित्य संमेलन भरविणाऱ्या संस्थांना अनुदान देण्याची सुरुवात झाली.
ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात अनेक समस्या आहेत. ग्रामजीवंनाच्या शोषणाचे स्रोत कायम आहेत. ग्रामीण जीवन अजूनही अंधश्रद्धा, बुवाबाजी, जातीयता, धार्मिक कट्टरता वाद, आर्थिक विषमता, भेदभावपूर्ण सामाजिक स्तर आहेत. यासर्व अडसरांचे निर्मूलन होऊन एख निकोप जीवनवृत्ती निर्माण होण्यासाठी केवळ शेतीमातीचे ग्रामीण साहित्य एवढ्याच संकल्पनेत गुरफटून न जाता साहित्यिकांनी समाजातील सर्वच स्तरांतील लोकजीवनाकडे सम्यक दृष्टीने पहावे अशी अपेक्षा नांदेड येथील सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी लोहा तालुक्यातील जवळा देशमुख या गावी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून व्यक्त केली. सप्तरंगी साहित्य मंडळाचे दुसरे संमेलन जवळा देशमुख येथील राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलतांना बीजभाषक अॅड. विष्णू गोडबोले म्हणाले की, ग्रामीण साहित्य हे कडवलेल्या तुपासारखे असते. साहित्यात शेतकरी आणि शेतीविषयक साहित्याशिवाय शेतमजूर, कष्टकरी जनतेच्या जीवनाचे प्रतिबिंब पडले पाहिजे असे ते म्हणाले. माजी जि. प. सदस्य श्रीनिवास मोरे यांनी माणसामाणसातील संवाद लोप पावत चाललेल्यामुळे अशा जनसंवाद साहित्य संमेलनाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. खरा भारत खेड्यांमधून दिसतो. देशातील अनेक गावे डिजिटल होत चालली आहेत. परंतु गावपातळीवरील समस्या अजूनही कायम आहेत. सर्वात जास्त समस्या निवडणुकीनंतर लोकांमध्ये निर्माण झालेल्या कट्टर मतभेदांमुळे जन्माला येतात. आपापसांतील मतभेद दूर झाल्यास गावांचा विकास शक्य आहे, असा सूर परिसंवादातील वक्त्यांनी लावला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार संतोष पांडागळे हे होते. तर परिसंवादात वक्ते म्हणून जिल्हा परिषदेचे माध्यम प्रमुख मिलिंद व्यवहारे, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. विलास ढवळे तसेच सरपंच प्रतिनिधी साहेबराव शिखरे, रिपब्लिकन योध्दा भगवान ढगे यांची उपस्थिती होती. जवळ्याच्याच राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने जवळा देशमुख येथे आयोजित सप्तरंगी साहित्य मंडळाचे दुसरे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन भरले होते. 'ग्रामजीवनातील समस्या आणि पत्रकारिता' या विषयावर बोलताना मिलिंद व्यवहारे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालवलेल्या सर्व लोकोपयोगी योजनांचा पुरेपूर लाभ ग्रामीण भागातील लोकांनी घेतला पाहिजे, तसेच महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये. शासनाच्या सर्व आरोग्यविषयक योजनांचा लाभ घेतला पाहिजे असेही ते म्हणाले. डॉ. विलास ढवळे म्हणाले की, शिक्षण हाच सर्व समस्यांवर उपाय आहे. मुलामुलींना उच्च शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे महाद्वार आहे. अध्यक्षीय समारोप करताना संतोष पांडागळे म्हणाले की, ग्रामीण भागातील समस्यांना आजच्या माध्यमांनी प्रथम प्राधान्य द्यावे. ग्रामीण लोकांना राजकीय शहाणपण आले पाहिजे. वैचारिक मतभेद व्हावेत पण मनभेदांमुळे गावचा विकास खुंटतो, हे लक्षात घेतले पाहिजे. पुन्हा योगायोग असा झाला की, जवळा देशमुख येथे पावणेदोन कोटी रुपयांच्या विकासकांना सुरुवात झाली.
सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूरगड येथील आनंद दत्तधाम आश्रमात तिसऱ्या राज्यस्तरीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या प्रचंड गाजलेल्या कवितेचे कवी अनंत राऊत हे होते. त्यांनी साहित्य म्हणजे विचार. सामाजिक बदलासाठी तसेच व्यवस्था परिवर्तनासाठी विचार महत्त्वाचा असतो. मानवता हा विचार आहे. हा विचार प्रसवण्यासाठी मानवताकेंद्रीत साहित्याची निर्मिती आवश्यक आहे. स्वार्थीसाठी अनेक राजकीय पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करत आहेत. मात्र साहित्यिकांनी कोणतीही गटबाजी किंवा राजकारण न करता एकत्र येऊन मानवतेची सत्ता स्थापन करावी, अशी भूमिका मांडली. तर माणसाची सेवा म्हणजेच मानससेवा हीच उच्च दर्जाची ईश्वरसेवा आहे, कष्टाला तथा परिश्रमालाच मोक्षाचे फळ लागते बाकी सर्व अंधश्रद्धा आहेत. माणूसच ईश्वरसाधनेच्या केंद्रस्थानी आहे असे प्रतिपादन सद्गुरू साईनाथ महाराज माहुरकर यांनी केले. साईनाथ महाराजांच्या आश्रमातच साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ते या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. साहित्य संमेलन म्हटले की परिसंवाद, कथाकथन, गझलसंध्या, कविसंमेलन, ठराव वाचन हे सत्र असतातच. यामधूनही सामाजिक प्रबोधन होत असते. आनंदाश्रमात सर्व नेत्यांच्या मोठ्या फोटो लावलेल्या आहेत. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जातीधर्माच्या पलिकडे जाऊन सर्व मानवजात एकच आहे असा संदेश देता आला, हे या संमेलनाचे गमकच म्हणायला हरकत नाही. भारतीय संविधानावर एक परिसंवाद ठेवून एक सशक्त विचारमंथनही घडून आले. गझलसंध्या हा गझल सादरीकरणाचा स्वतंत्र कार्यक्रम या संमेलनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आला. त्यामुळे एकापेक्षा एक सरस गझलांचे सादरीकरण होऊन रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची किमया गझलकारांनी साधली.
आता चौथे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन मुदखेड येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था मुदखेड व सप्तरंगी साहित्य मंडळ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील रणछोडदास मंगल कार्यालयात येत्या २७ जानेवारी रोजी सप्तरंगी साहित्य मंडळाच्या चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनासाठी आ. अॅड. श्रीजया चव्हाण, माजी आमदार राम पाटील रातोळीकर, माजी संमेलनाध्यक्ष कवी अनंत राऊत, पाणी चित्रपट फेम अभिनेत्री माधुरी लोकरे यांच्यासह आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त लावणी बालकलाकार डॉ. विद्याश्री येमचे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टे, तहसीलदार आनंद देऊळगावकर, पोलिस निरिक्षक वसंत सप्रे, नपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे, गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे, माजी गटशिक्षणाधिकारी दिलिप सुपे, ओबीसी चळवळीतील राष्ट्रीय नेते एस. जी. माचनवार, स्वागताध्यक्ष प्रविणदादा गायकवाड निमंत्रक प्रल्हाद इंगोले, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे यांची उपस्थिती राहणार आहे. दिवसभरात ग्रंथदिंडी, चित्र व नाणी प्रदर्शन, पुरस्कार वितरण, परिसंवाद, प्रकाशने, कथाकथन, गझलसंध्या, कविसंमेलन अशा विविध सत्रांतून साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. यात डॉ. माधव बसवंते, प्रा. संजय बालाघाटे, अॅड. विजय गोणारकर, बालाजी थोटवे, सुप्रसिद्ध कथाकार दिगांबर कदम, राम तरटे, स्वाती कान्हेगांवकर, सुरेश वडजे, गझलकार चंद्रकांत कदम, रोहिणी पांडे, स्वाती भद्रे, अंजली मुनेश्वर, दिपाली कुलकर्णी, निशा डांगे, विजय वाठोरे, विजय धोबे, आत्तम गेंदे, सुप्रसिद्ध कवी बालाजी कळसे, सदानंद सपकाळे, अशोक कुबडे हे सहभागी होणार आहेत. या संमेलनात जनसंवाद २०२५ पुरस्कार आणि मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान उमरीचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पाचवे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन पुढच्याच महिन्यात भोकर तालुक्यातील मातूळ या गावी होणार आहे. सतत संवाद साधण्याची आणि माणसं जोडण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. या प्रक्रियेचा अंत कदापिही होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद!
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025
Comments 0