संमेलनाध्यक्ष प्रो. डॉ. गजानन देवकर यांचे प्रतिपादन; पाचव्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनास ग्रंथदिंडीने झाला प्रारंभ!
संमेलनाध्यक्ष प्रो. डॉ. गजानन देवकर यांचे प्रतिपादन; पाचव्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनास ग्रंथदिंडीने झाला प्रारंभ!
नांदेड - जनसंवाद होणे काळाची गरज आहे. धावपळीच्या काळात जनसंवाद तुटत चालण्याची खंत अनेक साहित्यिकांनी आणि विचारवंतांनी व्यक्त केलेली आहे. संवादाच्या माध्यमातून समाजाला स्थैर्य देण्याचे कार्य अविरत ठेवणे गरजेचे आहे. संवाद हा संवादच असावा. संवादातून विसंवाद झालेल्या अनेक घटना आपण बघत आहोत. समाजाच्या विकासाखाली समाजाच्याच अधोगतीचे दर्शन घडत आहे. शासन स्तरावरून अनेक महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. रस्ते विकासाची गती जशी मोठी आहे तशीच ग्रामीण भागातील शिक्षणाची गती असणे आवश्यक आहे. दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातूनही जनसंवाद होणे आवश्यक आहे. जनसंवादासाठी समाजाला प्रत्येकाने जोडून घेतले पाहिजे. जनसंवादामुळे समाजात एकत्वाची भावना दृढ होते, असे प्रतिपादन येथील कै. बाबासाहेब गोरठेकर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ. गजानन देवकर यांनी केले. ते भोकर तालुक्यातील मातुळ येथे भरलेल्या पाचव्या राज्यस्तरीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात अध्यक्षपदावरुन बोलत होते.
यावेळी नांदेड लोकसभा खासदार प्रतिनिधी अजित चव्हाण, संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक प्रो. डॉ. गजानन देवकर, ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, कृषी उत्पन्न बाजार समिती उमरीचे सभापती शिरिषभाऊ गोरठेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव पाटील मातुळकर, ज्येष्ठ कथाकार दिगांबर कदम, कथाकार स्वाती कान्हेगांवकर, स्वच्छतादूत राजीव तिडके, सरपंच प्रतिनिधी प्रकाश कदम, उपसरपंच माधव बोईनवाड, पो.पा. लक्ष्मण बोईनवाड, चेअरमन मधुसूदन पवार, तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव कदम, स्वागताध्यक्ष सतीश मातुळकर, निमंत्रक बालाजी सूर्यतळे, मुख्य संयोजक दत्ताहरी कदम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम डांगे, माजी निमंत्रक प्रल्हाद हिंगोले, मुदखेडचे माजी गटशिक्षणाधिकारी दिलिप सुपे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिनिधी आनंदा वाघमारे, जिपहाचे मुख्याध्यापक पी. एस. मिस्त्री, गंगाधर जक्कलवाड, श्यामसुंदर बोईनवाड, मारुती भोकरे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे यांची उपस्थिती होती.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने भोकर तालुक्यातील मातुळ येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती व सप्तरंगी साहित्य मंडळ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित साहित्य मंडळाच्या पाचव्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात ग्रंथदिंडी, पुरस्कार वितरण, परिसंवाद, प्रकाशने, कथाकथन, गझलसंध्या, कविसंमेलन, ठराववाचन अशा विविध सत्रांतून साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. ग्रंथदिंडीने संमेलनास प्रारंभ झाला. यात गावकऱ्यांसह जिपहा मातुळचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका आणि भजनी मंडळ सहभागी झाले होते. उद्घाटन सत्राच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.
यावेळी मान्यवरांच्या सत्कारानंतर कवी जी. एस. भालेराव यांच्या काव्यानंद या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व समाजसाधना या साहित्य संमेलन विशेषांकाचे प्रकाशन झाले. खा. रविंद्र चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला. तसेच मान्यवरांची यथोचित भाषणे झाली. उद्घाटन सत्रातच विविध क्षेत्रातील कार्यरत मान्यवरांना जनसंवाद विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात जितेंद्र देशमुख, शिरीष लोणकर, सुभाष गड्डम, संगिता नेत्रगावे, नागोराव लोखंडे, प्रा. ओमपप्रकाश मस्के, गंगाधर मिसाळे यांचा समावेश होता. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक रणजित गोणारकर यांनी केले. सूत्रसंचालन कैलास धुतराज यांनी तर आभार नागोराव डोंगरे यांनी मानले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सप्तरंगी साहित्य मंडळाचे पदाधिकारी आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती मातुळ पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0