सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा महान दिग्दर्शक
सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा महान दिग्दर्शक
हिंदी चित्रपट सष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक, पटकथाकार श्याम बेनेगल यांचे नुकतेच वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धाप काळाने निधन झाले. १४ डिसेंबर १९३४ रोजी हैद्राबाद येथ त्रिमुलागिरी येथे जन्मलेले श्याम बेनेगल हे हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रतिथयश दिग्दर्शक होते. त्यांचे पूर्ण नाव श्यामसुंदर श्रीधर बेनेगल असे होते. श्याम बेनेगल यांना लहानपापासूनच चित्रपटाचे वेड होते. उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात मास्टर ऑफ आर्टसची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी मुंबईतील एका कंपनीत जाहिरात कॉपीराईटर म्हणून काम केले. यावेळी त्यांनी जाहिराती, लघुपट बनवताना चित्रपट निर्मितीच्या तांत्रिक गोष्टींचा अनुभव घेतला हाच अनुभव त्यांना पुढील काळात उपयोगी ठरला. सुरुवातीला त्यांनी काही लघुपटाची निर्मिती केली. १९७४ साली त्यांनी अंकुर हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. अंकुर चित्रपटात त्यांनी भारतातील जातीव्यवस्था, वर्ग वर्चस्व, स्त्री पुरुष भेदाभेद यांचे चित्रण केले. हा चित्रपट तिकीट बारीवर तर यशस्वी ठरलाच पण या चित्रपटाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली. या पुरस्काराला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने श्याम बेनेगल यांची जगभर चर्चा होऊ लागली. अंकुर नंतर त्यांनी निशांत आणि मंथन या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ग्रामीण भागातील वास्तववादी चित्रण या चित्रपटातून त्यांनी केले. स्मिता पाटील, अमरीश पुरी, नसरुद्दीन शहा, ओम पुरी, शबाना आझमी, अन्नू कपूर, कुलभूषण खरबंदा यासारखे दिग्गज आणि महान कलाकार श्याम बेनेगल यांच्यामुळेच चित्रपट सृष्टीला लाभले. श्याम बेनेगल यांनीच या कलाकारांना पहिल्यांदा संधी दिली. करणदास चोर, भूमिका, जूनून, कलयुग, आरोहण, मंडी, त्रिकाल, अंतर्नाद, सूरज का सातवा घोडा, मम्मो, सरदारी बेगम, द मेकिंग ऑफ महात्मा, समर, जुबेदा, हरिभरी, नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट प्रेक्षकांना भावले. हे सर्व चित्रपट वेगळ्या धाटणीचे होते. या सर्व चित्रपटात त्यांनी तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. हिंदी चित्रपट सृष्टीत समांतर चित्रपटाची चळवळ श्याम बेनेगल यांनी सुरू केली. व्यवसायिक चित्रपटात दाखवण्यात येणारा धांगडधिंगा त्यांच्या चित्रपटात नव्हता म्हणूनच चित्रपटात कोणताही धांगडधिंगा न दाखवता तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा चित्रपट दिग्दर्शक अशी त्यांची ओळख बनली. त्यांनी चित्रपटातून मांडलेले मुद्दे, कथा प्रेक्षकांना विचार करायला लावणारे असायचे. त्यांनी दिगदर्शित केलेल्या अंकुर नावाच्या चित्रपटाची तर जगाला दखल घ्यावी लागली. त्यांनी दिग्दर्शित केलेले सर्वच चित्रपट प्रेक्षकांना भावले. त्यांचे सर्व चित्रपट सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यातील संघर्षावर भाष्य करणारे असायचे म्हणून प्रेक्षकांनी त्यांच्या चित्रपटांना पसंती दिली. त्यांनी दूरदर्शनवरील काही मालिकांचे देखील दिग्दर्शन केले. पंडित जवाहलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकावर आधारित भारत एक खोज ही ५३ भागांची मालिका त्यांनी दूरदर्शनवर दिग्दर्शित केली. उच्च निर्मितीमूल्य असलेली ही मालिका त्या काळात बरीच लोकप्रिय ठरली. अमरावती की कथाये, कथा सागर, संविधान या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिका देखील प्रेक्षकांना भावल्या. श्याम बेनेगल यांना अनेक पुरस्कार मिळाले. चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके हा मानाचा पुरस्कार त्यांना २००५ साली देण्यात आला. भारत सरकारनेही त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे मानाचे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. सामाजिक मुद्द्यांवर चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावी भाष्य करणारा त्यांचा सारखा दिग्दर्शक पुन्हा होणार नाही. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा संघर्ष, त्यांचे प्रश्न चित्रपटातून मांडणारा एक महान दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. महान दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0