लातुरात दोन दिवसीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन
लातुरात दोन दिवसीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन
लातूर : अभिजात फिल्म सोसायटी आणि दयानंद एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लातूरमध्ये प्रथमच दोन दिवसीय स्पर्धारुपी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन दि. २३ आणि २४ डिसेंबर २०२४ रोजी दयानंद सभागृह येथे करण्यात आले आहे.
या फेस्टिवलमध्ये शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, ॲनिमेशन आणि व्हिडिओ सॉंग आदी प्रकारांचा समावेश असणार आहे. चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानास स्मरून व्ही. शांताराम यांच्या नावाने सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये देण्यात येणार आहे. मिळणार आहे. द्वितीय आणि तृतीय पारितोषिक अनुक्रमे १५ आणि ११ हजार देण्यात येणार आहे. अभिजात फिल्म सोसायटी लातूरमध्ये मागील दोन दशकांपासून आशयघन सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मनोरंजनापलीकडे सिनेमाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा आणि अधिक सिनेसाक्षर समाज घडावा, या हेतूने विविध कार्यक्रम सोसायटी राबवत असून हा शॉर्ट फिल्म फेस्टिवल याच प्रक्रियेचा पुढचा टप्पा असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी सांगितले. हा लघुपट महोत्सव पूर्णपणे नि:शुल्क असून रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवास भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजन व कृतीसमिती कडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातल्या एकंदर शिक्षणव्यवस्थेचे अतिशय कलात्मक चित्रण मुक्ता, शाळा सुटली आणि प्रश्न आदी लघुपटांतून बघायला मिळणार आहे. तर मिसिंग सिन्स १९५६, कॅनव्हास आणि नाम क्या है तुम्हारा ? सारख्या लघुपटांमधून सामाजिक असमतोलाचे प्रतिकात्मक चित्रण पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे मलर, खिचडी भात, सापशिडी, दारं आणि मिरग या लघुपटांच्या माध्यमातून स्त्री प्रश्नांकडे बघण्याचा पारंपारिक दृष्टीकोन भेदण्याचा प्रामाणिक प्रयत्न तरुण दिग्दर्शकांकडून झाला आहे. तामिळ , तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतील वैविध्यपूर्ण विषयांवरील लघुपटांचाही या महोत्सवात समावेश करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ॲनिमेशन आणि डॉक्युमेंटरीज सुद्धा या महोत्सवात पाहायला मिळणार असून स्थानिक फिल्ममेकर्सच्या कलाकृतींना सुद्धा विशेष स्थान देण्यात आले आहे.
चित्रपटनिर्मितीच्या एकूण २० विभागात वेगवेगळी पारितोषिके देण्यात येणार असून या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विनोद कांबळे आणि ज्येष्ठ चित्रपट समीक्षक संतोष पाठारे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0