एका वर्षात मनपा करणार १०६३ कोटींचा खर्च
एका वर्षात मनपा करणार १०६३ कोटींचा खर्च
वर्षअखेर १७ लक्ष रुपये शिल्लक राहण्याचा अंदाज
लातूर /प्रतिनिधी :- मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी गुरुवारी (दि.२७)शहर महानगरपालिकेचे सन २०२५-२६ चे अंदाजपत्रक सादर केले.या वित्तीय वर्षात मनपाकडे एकूण १ हजार ६४ कोटी ७ लक्ष रुपये येणार असून त्यापैकी १ हजार ६३ कोटी ९० लक्ष रुपयांचा खर्च विविध योजना आणि उपक्रमावर केला जाणार आहे. वर्षभरात पालिकेकडे १७ लक्ष रुपये शिल्लक राहणार असल्याचा अंदाज आयुक्त मनोहरे यांनी व्यक्त केला आहे.
मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी २०२५-२६ चे मूळ अंदाजपत्रक सादर करताना उत्पन्नाच्या ठळक बाबी अधोरेखित केल्या आहेत.आगामी काळात २०० कोटी ६३ लक्ष रुपयांचे महसुली उत्पन्न अपेक्षित आहे. ४६ कोटी ८८ लक्ष रुपये असाधारण जमा, कर्ज व निधीच्या माध्यमातून १२५ कोटी ९७ लक्ष रुपये तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ४० कोटी ७० लक्ष रुपये जमा होणे अपेक्षित आहे. २२४ कोटी ३५ लाख रुपये भांडवली जमा तर केंद्र शासनाच्या विविध अनुदानातून २८५ कोटी १० लक्ष रुपये पालिकेला मिळणे अपेक्षित आहे.या माध्यमातून वर्षभरात पालिकेकडे १ हजार ६४ कोटी ७ लक्ष रुपये येणे अपेक्षित आहे.
मनपाच्या तिजोरीत निधी जमा होणार असला तरी त्यातून खर्चही होणार आहे.आगामी आर्थिक वर्षात पालिकेला २३६ कोटी २४ लाख रुपये महसुली खर्च करावा लागणार आहे. ६९ कोटी ६७ लक्ष रुपयांचा असाधारण खर्च असून कर्ज व निधीसाठी १२५ कोटी ९७ लक्ष रुपये खर्च करावयाचे आहेत.विविध शासकीय कल्याणकारी योजना साठी ६२ कोटी २८ लाख रुपये तर भांडवली खर्चासाठी पालिकेला २८४ कोटी ६४ लक्ष रुपये लागणार आहेत.केंद्र शासनाच्या अनुदानातून २८५ कोटी १० लाख रुपये खर्च होणार असून वर्षात १०६३ कोटी ९० लक्ष रुपये खर्च होणार आहेत.
अपेक्षित उत्पन्नातून खर्च वजा जाता पालिकेकडे १७ लक्ष रुपये शिल्लक राहतील,असा अंदाज आयुक्त मनोहरे यांनी व्यक्त केला.
आगामी वर्षात बेघरांना निवारा, प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी, विस्तारित आरोग्यसेवा, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, जननी रथ उपक्रम, अद्ययावत नेत्र तपासणी युनिट व अद्ययावत दंत चिकित्सा केंद्रासाठी मनपा निधी खर्च करणार आहे.प्रधानमंत्री आवास योजना,रमाई आवास योजना यावर देखील मोठा खर्च होणार आहे.
विशेष म्हणजे मनपाकडून शहरातील संकलित कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून वरवंटी कचरा डेपो येथे दररोज १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे.मनपाच्या वतीने बायोगॅस प्रकल्पातून दररोज ५६० युनिट वीज निर्मिती होत आहे. गांधी चौक येथे घंटागाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे.
मनपात स्थापनेनंतर पहिल्यांदाच सरळ सेवेद्वारे ८० पदांची भरती प्रक्रिया पार पडली आहे.आगामी आर्थिक वर्षात पालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य,डिजिटल साहित्य, गुणवत्ता चाचण्या यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मनपा मध्ये ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांसाठी लिफ्ट सुरू केली जाणार असून त्यासाठी आर्थिक तरतूद केली गेली आहे.
अमृत २.० अभियानाअंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेस मान्यता मिळाली असून त्यासाठी २५९ कोटी २२ लक्ष रुपये तरतूद करण्यात आली आहे.नव्या जलवाहिनीसाठी निधी देण्यात येणार असून भुयारी गटार योजनेसाठी ३०५ कोटी १९ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. भुयारी गटार योजना भाग २ साठी २९४ कोटी ६७ लक्ष रुपयांचा निधी दिला जाणार आहे. शहर स्वच्छतेसाठी यंत्रांचा वापर केला जात असून त्यासाठीही अर्थ पुरवठा पालिका करणार आहे.
यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यात नागरिकांचा सहभाग असावा या हेतूने पालिकेने नागरिकांकडून सूचना मागविल्या होत्या. त्या सूचनांचा अर्थसंकल्पात अंतर्भाव करण्यात आला आहे. शहरातील नागरिकांना अधिकाधिक सोयी -सुविधा मिळाव्यात यासाठी पालिका कटिबद्ध आहे.शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासोबतच शिक्षण, आरोग्य,पाणी यासारख्या मूलभूत गरजा पुरविण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे,मुख्य लेखा अधिकारी रावसाहेब कोलगणे, मुख्य लेखा परीक्षक कांचन तावडे यांच्यासह सर्व अधिकार्यांची उपस्थिती होती.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0