·प्रत्येक इमारतीवर ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’ कार्यान्वित करण्याचा निर्धार
·प्रत्येक इमारतीवर ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’ कार्यान्वित करण्याचा निर्धार
·प्रत्येक इमारतीवर ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’ कार्यान्वित करण्याचा निर्धार
लातूर, दि. ०२ : जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळविण्याबाबत विचारमंथन करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत ‘उष्णतेशी लढा’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील उष्णतेचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येतील. त्याची सुरुवात ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’द्वारे केली जाईल. यासाठी ‘अमृतधारा अभियान’ हाती घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच नवी दिल्ली येथील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटचे शाश्वत अधिवास विभाग प्रमुख रजनीश सरीन, पुणे येथील ज्येष्ठ वास्तूविशारद अविनाश हावळ, सार्वजनिक आरोग्य चळवळीतील तज्ज्ञ डॉ. अनंत फडके यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.
हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे केवळ भौगोलिकच नाही तर आर्थिक परिणामही समोर येत आहेत. जवळपास ४० टक्के अर्थकारण हवामान बदलामुळे प्रभावित होत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे लाखो लोकांच्या आरोग्यावर यामुळे दुष्परिणाम होत आहे. आपल्या जिल्ह्यातही काही प्रमाणात या संकटाचा सामना करावा लागत आहे. आगामी काळात हे संकट अधिक तीव्र होवू नये, यासाठी लवकर उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पावले उचलून लातूर जिल्ह्याला ५० वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजेच सन २०३२ पर्यंत ‘हरित लातूर’ ही संकल्पना प्रत्यक्ष आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यात पुढील दोन महिन्यात ‘अमृतधारा’ अभियान प्रभावीपणे राबवून ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’ची कामे केली जातील. प्रत्येक शासकीय इमारतीसह खासगी इमारतींवरही ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’ करण्यासाठी लोकसहभागातून हे अभियान राबविले जाईल. यामाध्यमातून आगामी पावसाळ्यात पडणारे पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविण्याला प्राधान्य दिले जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. तसेच या अभियानात सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आपले कार्यालय, आपले राहते घर येथे ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’ करून सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. तसेच विहीर पुनर्भरण, वृक्ष लागवड आदी उपक्रमालाही गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना हाती घेणे गरजेचे : श्री. देऊळगावकर
लातूर जिल्ह्यातही गेल्या काही वर्षात वातावरणीय बदलांमुळे झालेल्या परिणामांचा सामना येथील नागरिकांना करावा लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे यापेक्षाही अधिक गंभीर संकटाला आपल्याला सामोरे जावे लागू शकते. मात्र वेळीच सावध होवून पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना हाती घेतल्यास पाणी टंचाई, उष्माघात यासारख्या संकटांपासून दूर राहता येणे शक्य आहे. सध्या मोठ्या प्रमणात शहरांचे काँक्रीटीकरण होत असल्याने शहरातील उष्णतेचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी बांधकाम करतांना उष्णता शोषून घेणारे साहित्य वापरण्याला प्राधान्य द्यायला हवे. तसेच शहरामध्ये वृक्ष लागवड, हिरवी मैदाने निर्माण करायला हवीत, असे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी सांगितले.
उष्णतेची लाट रोखण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणाच्या लढाईचे शिलेदार व्हावे : श्री. सरीन
लातूर जिल्ह्याचे तापमान पहिले, तर काही उपाययोजना प्रभावीपणे केल्यास जिल्ह्यातील उष्णतेचे प्रमाण कमी करता येणे शक्य आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी पर्यावरणाच्या लढाईचे शिलेदार होवून काम करावे लागेल, असे नवी दिल्ली येथील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटचे शाश्वत अधिवास विभाग प्रमुख रजनीश सरीन म्हणाले. देशातील काही जिल्हे सध्या उष्णतेच्या बाबतीत धोकादायक स्थितीत आहेत. लातूरला त्या दिशेने जाण्यापासून रोखण्यासाठी जलसंवर्धन व वृक्ष संवर्धनावर भर देण्याची गरज आहे. तसेच इमारतीचे बांधकाम करताना परिसरात वृक्ष लागवड, खेळती हवा यासाठी शहरामध्ये ‘कुलिंग मास्टर प्लान’ तयार करण्याची गरज आहे. त्यामध्ये हिरवी झाडी, उद्याने याचे योग्य नियोजन करून शहरात जास्तीत जास्त वृक्ष लागवडीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
ग्रीन बिल्डींग संकल्पना अंमलात आणण्याची गरज : श्री. हावळ
हवामानातील बदलांचा दुष्परिणाम म्हणून यावर्षीची उष्णतेची लाट दीर्घकाळ राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. उष्णतेच्या लाटेवर नियंत्रण मिळविणे, तसेच आगामी काळात या संकटापासून सुटका करून घेण्यासाठी तातडीच्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजना अशा दोन प्रकारच्या उपाययोजना हाती घेणे आवश्यक असल्याचे पुणे येथील ज्येष्ठ वास्तुविशारद अविनाश हावळ यांनी सांगितले. ताडीने करावयाच्या उपाययोजनामध्ये अस्तित्वात असलेल्या इमारतींच्या परिसरात वृक्ष लागवड, टेरेस गार्डन, सौरउर्जा निर्मिती, बायोगॅसची निर्मिती व वापर, ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’ यासारख्या बाबींवर लक्ष द्यावे लागेल. तसेच दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये नवीन इमारतीचे बांधकाम करताना ग्रीन बिल्डींग संकल्पना अंमलात आणणे, शहरातील हरित पट्टे विकसित करण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य चळवळीतील तज्ज्ञ डॉ. अनंत फडके यांनी उष्माघाताची कारणे, उष्माघात झाल्यानंतर घ्यावयाची खबरदारी आदी बाबींवर मार्गदर्शन केले. तसेच उष्माघातापासून बचावासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करून काय खबरदारी घ्यावी, याची माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकिब उस्मानी यांनी केले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0