श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
लातूर : येथील अभिनव मानव विकास संस्था द्वारा संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन करून उपस्थितांची दाद मिळवली. याच सोहळ्यात अभिनव गुणवंत शिक्षक पुरस्काराचेही मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पहिल्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर यांनी मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विद्यालयात शिक्षण घेतात. ते खरोखरच भाग्यवान आहेत, असे प्रतिपादन केले.विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास असे नेहमीच म्हणले जाते. पण हा विकास नेमका काय हे शाळेच्या आवारातील बोलकी भिंत, ग्रंथालय, डिस्प्ले बोर्ड पाहिल्यावर लक्षात येते.
विद्यालयातील भौतिक सुविधांमध्ये असलेले प्रशस्त मैदान आणि सुसज्ज ग्रंथालय पाहून मन सुखावून गेले. विनाअनुदानित विद्यालयात तीन क्रीडा शिक्षक, तीन संगीत शिक्षक पाहून आश्चर्य वाटले. पालकांसाठी ग्रंथालय सुरु करणारी, मुलांना स्वतः प्रकल्प करायला लावणारी अशी देखणी शाळा राज्यातल्या हातावरच्या बोटावर मोजणाऱ्या काही प्रमुख शाळांमध्ये निश्चितच असेल, असा विश्वासही नणंदकर यांनी यावेळी व्यक्त केला. या विद्यालयाची भरभराट होण्यासाठी पालकांनी आपले योगदान देण्याची गरज आहे. तसेच जसे, शिक्षकांना प्रशिक्षण, दिले जाते तसे पालकांनाही प्रशिक्षण देण्याची गरज आहे. जेणेकरून आपल्या पाल्याची वाढ कोणत्या 'पॅटर्न' ने करायची हे लक्षात येईल,असे मत नणंदकर यांनी व्यक्त केले.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन करताना गणिताचे ज्येष्ठ अभ्यासक विश्वनाथ होळकुंदे यांनी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली याचा आनंद होत आहे. या विद्यालयात खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होत आहे, असे सांगितले. सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त क्रीडांगणाबरोबरच काळाची गरज लक्षात घेऊन मराठी माध्यमाच्या या शाळेने इंग्रजी (सेमी) माध्यमाकडे वाटचाल करुन, नेत्रदीपक प्रगती केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या तिसऱ्या सत्रास प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे अतिरिक्त पोल्स अधीक्षक अजय देवरे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी आत्ता सुरु असलेल्या कार्यक्रमातील नीटनेटकेपणा पाहिल्यानंतर लक्षात येते की, या विद्यालयात नक्कीच शिक्षणातही नेटकेपणा असणार आहे. तुमचे पाल्य खरेच भाग्यवान आहेत जे या विद्यालयात शिक्षण घेत असल्याचे बोलून दाखवले.
आपल्या पाल्याला उत्तम-शिक्षण, डॉक्टर, इंजिनिअर करून त्याला चांगले पॅकेज मिळेल, असे पालकांचे स्वप्न असते. पण हे स्वप्न पूर्ण करताना तो आपले मन मारून जगत तर नाही ना? हे पाहण्याची पालकांची जबाबदारी असते. आपल्या इच्छा, आकांक्षा, मुलांवर लादणे म्हणजे त्यांना घडवले असे होत नाही. आजची पिढी ही खूप चंचल आहे. त्यांची एकाग्रता कमी झाली आहे. त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना करायला देऊन ते आनंदाने जगतील यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत, असेही देवरे यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा यांनी मनोगतात विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडला. विद्यालयात सुरु असलेल्या स्व. नंदकिशोर भार्गव शिक्षण अभियानाबाबत सांगितले. विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष अतुल देऊळगावकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात विद्यालयाची स्वच्छता ठेवणारे, मुलांची काळजी घेणारे, त्यांच्या दुखापतीवर मायेने मलम करणाऱ्या मावशी, मामांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यालयातील भूगोल विषय शिकवणारे नितीन उपरे यांना यावर्षीच्या अभिनव गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या स्नेहसंमेलनाच्या अनुषंगाने हे वर्ष विख्यात गायक मोहम्मद रफी यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. जगप्रसिद्ध तबला वादक उस्ताद जाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल विद्यार्थ्यांनी तबला वादन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच संत गाडगेबाबा, चोखा मेळा या संतांसह इसापनितीतील कथांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला गेला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक रमाकांत स्वामी यांनी सांगितले की, विविध गुणदर्शनातील विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन यावर्षी तीन सत्रात स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनानंतर मुलांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. सामुहिक नृत्य, तबलावादन याबरोबरच, कथाकथन, काव्यवाचन, वक्तृत्व, वादविवाद, नाट्यछटा, अभिवाचन, एकपात्री अभिनय, मूक अभिनय, जादूचे प्रयोग, आत्मनिवेदन, नृत्य, गायन वैयक्तिक सादरीकरणही झाले. यावेळी संस्थेचे सचिव कमलकिशोर अग्रवाल, कोषाध्यक्ष जयेश बजाज यांच्यासह मान्यवर सदस्य उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0