ज्योतिबा फुले यांनी माणसाचे स्वभान जागे केले
ज्योतिबा फुले यांनी माणसाचे स्वभान जागे केले
ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेशदादा गायकवाड यांचे प्रतिपादन; भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमाला
नांदेड - आपला भारत देश हजारो जातीसमुहांनी बनलेला देश आहे. आपले स्वभान नसलेल्या अनेक जाती आजही आपल्या देशात आहेत. परंतु ज्योतिबा फुले यांनी पिढ्यानपिढ्या अज्ञान, अंधश्रद्धा, खुळ्या समजुती आणि मानसिक गुलामगिरीत पशुहीन जीणं जगणाऱ्या इथल्या व्यवस्थेतील तळागाळातील माणसाचे स्वभान जागे केले असे प्रतिपादन येथील ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेशदादा गायकवाड यांनी केले. ते भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विषयक प्रश्नांचे अभ्यासक बालाजी थोटवे तर प्रमुख अतिथी म्हणून इंजि. के. घनचक्कर, ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते संतोष घटकार तसेच प्रज्ञाधर ढवळे, सटवाजी माचनवार, प्रा. डॉ. श्रीमंत राऊत, संजय मोरे, सतिश शिंदे, राजेश चिटकुलवार आदींची उपस्थिती होती.
येथील भारतीय पिछडा शोषित संघटन, लसाकम आणि सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर दरमहा एक अशा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या मालेतील पाचवे पुष्प येथील ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेशदादा गायकवाड यांनी 'म. फुले यांचे समतेचे तत्त्वज्ञान आणि भारतीय संविधान' या विषयावर गुंफले. ते पुढे बोलतांना म्हणाले की, फुल्यांनी मांडलेले सामाजिक समतेचे तत्त्वज्ञान आजच्या भारतीय संविधानात दिसत असले तरी ओबीसी समुहातील शेवटच्या माणसापर्यंत त्याचे कार्यान्वयन झालेले दिसत नाही. आजच्या सत्ताधाऱ्यांनी फुले आंबेडकरांचे आणि संविधानाचे तत्वज्ञान बाजूला ठेवून ओबीसींना न्याय देण्याची प्रक्रियाच कुंठित करुन ठेवली आहे. या देशातल्या शेवटच्या माणसाला संविधान माहीत आहे का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. सरकारकडे सर्वसामान्यांच्या उत्थानाचा कार्यक्रमच नसल्याचा आरोप त्यांनी केला. अध्यक्षीय समारोपात बालाजी थोटवे यांनी सत्यशोधक समाज हा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक सुधारणा चळवळीचा एक महत्त्वाचा भाग होता. या संस्थेने समाजात सामाजिक न्याय, शिक्षण आणि प्रबोधन निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. समता, स्वातंत्र्य आणि न्याय, बंधुता या फुल्यांच्या समग्र वाङमयात आढळणाऱ्या मूल्यतत्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात अंतर्भूत केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. मान्यवरांच्या सत्कारानंतर व्याख्यानास प्रारंभ झाला. तत्पूर्वी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. डॉ. श्रीमंत राऊत यांनी केले. सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी तर आभारप्रदर्शन सतिश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय पिछडा शोषित संघटन, लसाकम आणि सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विविध क्षेत्रातील संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
निवडणूक प्रक्रिया बदलणे गरजेचे...
आपल्या देशातील निवडणूक प्रक्रिया सदोष आहे. आजच्या राजसत्तेने धर्मसत्ता, न्यायसत्ता याबरोबरच निवडणूक प्रक्रियाही हाती घेतली आहे. सत्ता मिळवण्यासाठी सगळीकडे फेक नॅरेशनचा बोलबाला सुरू आहे. जाती धर्मात वेगवेगळ्या कारणांनी विषवल्ली पेरण्याचे काम सुरू आहे. ओबीसींसारख्या मोठ्या समुहाला सत्तेचे भागीदार बनणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी कणखर भूमिका घेतली पाहिजे. आरक्षणाचे समग्र धोरण लोकांपुढे आले पाहिजे. ओबीसींना त्यांचे राजकीय अधिकार मिळायलाच हवेत. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया बदलणे गरजेचे आहे, असे गायकवाड म्हणाले. आरक्षणाचे उप वर्गीकरण हे मृगजळ आहे असे सांगून त्यांनी अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाला विरोध दर्शविला.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0