रक्तात भीम माझ्या हृदयामधे शिवाजी याहून श्रेष्ठ कुठली मी खानदान सांगू?
रक्तात भीम माझ्या हृदयामधे शिवाजी याहून श्रेष्ठ कुठली मी खानदान सांगू?
नांदेड - शिवजन्मोत्सव सोहळा समिती व सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वे जनसंवाद ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नुकतेच भोकर तालुक्यातील मातुळ येथे प्रो.डॉ.गजानन देवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या संमेलनाच्या गझलसंध्या या सत्रात विविध ठिकाणांहून आलेल्या गझलकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिव विचारांचा जागर घडवून आणला. यावेळी स्वागताध्यक्ष सतिश पाटील मातुळकर, निमंत्रक बालाजी सूर्यतळे, सरपंच प्रतिनिधी प्रकाश कदम, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, कोषाध्यक्ष शंकर गच्चे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, सचिव चंद्रकांत कदम, मुख्य संयोजक दत्ताहरी कदम, महिला विभाग संघटक रुपाली वागरे वैद्य आदींची उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळ व भोकर तालुक्यातील मातुळ येथील शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य विचारांना समर्पित अशा या साहित्य संमेलनातील गझलसंध्या सत्राचे अध्यक्ष म्हणून गंगाखेड येथील ख्यातनाम गझलकार आत्माराम जाधव होते. हे धर्मग्रंथ मित्रा...बांधून ठेव सारे या आंधळ्या पिढ्यांना चल संविधान सांग...रक्तात भीम माझ्या हृदयामधे शिवाजी, याहून श्रेष्ठ कुठली मी खानदान सांगू? ही गझल सादर करुन उपस्थितांच्या अंतःकरणात हात घातला. सुप्रसिद्ध गझलकार गजानन वाघमारे यांच्या अशा आशयघन शेरांनी सूत्रसंचालक चंद्रकांत कदम (सन्मित्र) यांनी गझलसंध्येची सुरेल सुरुवात केली. हो नव्याने गड नवा बांधायचा आहे मला...एक शिवबा हरघरी घडवायचा आहे मला या गझलेने वाहवा मिळवली. अशा दमदार शेरांची तरन्नुम गझल गात गझलकार यशवंत मस्के यांनी गझलसंध्येचा आगाज केला व रसिकांची भरभरुन दाद मिळवली.
तलवारीच्या पात्यावरचे जगणे असते,इतके सोपे कुठे शिवाजी बनणे असते? ताना येसा बाजी नेता आणि बहिर्जी...मैत्रीमध्ये प्राण फुंकतो असा शिवाजी अशा आशयघन शेरांनी गझलकारा रोहिणी पांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत उपस्थितांना अंतर्मुख केले.सिंह शिवबा पूत्र छावा शूरतेची खाण आहे, दख्खनी मातीस इथल्या वीरता वरदान आहे...आज का नाही सुरक्षित आमची माता बहिणही? शिवप्रभुंचा मावळा झाला कसा गतप्राण आहे? अशा शेरांमधून आजच्या अस्वस्थ काळात शिवविचारांची असलेली नितांत गरज गझलकार विजय धोबेंनी स्पष्ट केली. शिवबासमान माझ्या आहे इथे कुणी का? दिसते हरेक महिला आई बहीण ज्याला...असे मार्मिक शेर सादर करुन गझलकार पत्रकार विजय वाठोरे यांनी रसिकांची दाद मिळवली. कशी कळावी तुला जिजाई? कुठे शिवाजी तुझ्यात आहे? अशा वैचारिक शेरांनी गझलकारा अंजली मुनेश्वर यांनी उपस्थितांची दाद मिळवली. नभी भगवा फडकतोया स्वराज्याचा
दऱ्याखोऱ्यात शिवबाचा ठसा आहे...अशा बहारदार गझलेने गझलकार सतीश देशमुख यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. आई तुझ्या मुलाला कोळून पाज शिवबा, त्याला दिसेल परक्या स्त्रीच्या रुपात आई...असे आशयघन सिग्नेचर शेर व गझलांनी प्रख्यात गझलकार आत्तम गेंदे यांनी रसिकांना खिळवून ठेवले.
झुंजार करारी सच्चे शिवराय समजल्यावरती, सामान्य माणसाचीही तलवार भवानी होते...तुला फक्त गझलेतली जाण चंद्रा, जगाची उभ्या वेधशाळा शिवाजी...अशा मार्मिक तरन्नुम गझल सादरीकरणाने सूत्रसंचालक गझलकार चंद्रकांत कदम (सन्मित्र) यांनी रसिकांना भारावून टाकले. वीर शिवबाची पताका घेतली हातात मी, तोच कावा तोच छावा घेतला डोक्यात मी....असा एकाहून एक सरस सिग्नेचर शेर व गझलांनी गझलसंध्या अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी रसिकांची भरभरुन दाद मिळवली व गझलसंध्या सत्राचा शानदार समारोप केला. गझलसंध्येचे सूत्रसंचालन चंद्रकांत कदम यांनी केले तर आभार रुपाली वागरे वैद्य यांनी मानले. दर्दी रसिकांची उपस्थिती व प्रतिक्रियांवरुन यापुढे ग्रामीण भागातही गझलेला लोकाश्रय व रसिकवर्ग मिळेल याची खात्री वाटते, हा विचार गझलसंध्येने दिला.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0