जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
लातूर, दि. 13 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 10 जानेवारी, 2025 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 24 जानेवारी, 2025 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.
शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे, चित्रे, चिन्हे फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास, मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अंत्ययात्रा, विवाह, कामावरील पोलीस किंवा इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना लागू राहणार नाही. तसेच शस्त्रबंदी व जमावबंदी काळात सभा, धार्मिक मिरवणूक, मोर्चा, उपोषण यांना परवानगी देण्याचे सर्व अधिकार हे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व संबंधित पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील. त्यांनी परवानगी देण्यापूर्वी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून परवानगी द्यावी, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
***
तालुकास्तरीय लोकशाही दिनात 30 दिवसांत कार्यवाही न झाल्यास
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात करता येईल तक्रार
लातूर, दि.13 :- जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, तालुकास्तरीय लोकशाही दिना 30 दिवसांत कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरावर अर्ज करता येईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी कळविले आहे.
लोकशाही दिनामध्ये अर्जदाराने आपल्या वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक असून अर्जदार यांनी प्रथम तालुकास्तरावर तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन तर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. तसेच जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
****
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2023-24 साठी
14 ते 26 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत
लातूर, दि.13 :- क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या जेष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
29 डिसेंबर 2023 व 25 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली 2023 विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेली खेळाडू, व्यक्ती 14 ते 26 जानेवारी, 2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज सादर करणाऱ्या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर स्क्रोलींग लिंक (Scrolling Link) मध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर 14 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत 26 जानेवारी 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूर जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
****
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी
31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका आणि पुस्तके पाठविण्याचे आवाहन
लातूर दि. 13 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीसाठी 2024 या प्रकाशन वर्षासाठी राज्य शासनाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात प्रवेशिका आणि पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400 025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील.
महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'नवीन संदेश' या सदरात 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 नियमावली व प्रवेशिका' या शीर्षाखाली व 'What's new' या सदरात 'Late Yashwantrao Chavan State Literature Award 2024 Rules Book and Application Form' शीर्षाखाली आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णतः भरून आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात 31 जानेवारी 2025 पर्यंत पोहचतील, अशा बेताने पाठवाव्यात. लेखक किंवा प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.
मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक किंवा प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक किंवा प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य 31 जानेवारी 2025 पर्यंत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.
लेखक किंवा प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर, पाकीटावर ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका' असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2025 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सचिव यांनी कळविले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0