'लातूर पॅटर्न' घडला : प्रा. शिवराज मोटेगावकर
'लातूर पॅटर्न' घडला : प्रा. शिवराज मोटेगावकर
लातूर : संपूर्ण राज्यात अग्रेसर ठरलेला तसेच आजही ज्याची शैक्षणिक क्षेत्रात आवर्जून चर्चा होते,असा ' लातूर पॅटर्न' शिक्षकांनी शिकविल्याने आणि विद्यार्थी शिकल्यामुळे घडला असल्याचे प्रतिपादन लातूरच्या आरसीसी क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुख्याध्यापकांच्या ६१ व्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनात शुक्रवारच्या दुसऱ्या सत्रात बोलताना केले.
लातूर येथील थोरमोटे लॉन्स येथे लोकनेते विलासराव देशमुख नगरीत पार पडणाऱ्या या दोन दिवसीय शैक्षणिक संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात 'स्पर्धेच्या युगात पालकांची भूमिका व कर्तव्य ' या विषयावरील व्याख्यानात प्रा. शिवराज मोटेगावकर मार्गदर्शन करत होते. यावेळी राज्याचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे , के.एस. ढोमसे, नंदकुमार बारवकर, दत्तात्रय कदम, मनोहर पवार, खंडेराव जगदाळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या व्याख्यानात प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी शिक्षकांनी विद्यार्थी आणि पालक यांच्यातील दुवा म्हणून काम केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून जास्त अपेक्षा ठेवाव्यात. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ध्येय निश्चित करून त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करायला हवा. शिक्षणाचा बहुचर्चित लातूर पॅटर्न उगाच नाही घडला. शिक्षकांनी शिकवल्याने आणि विद्यार्थी शिकल्याने तो घडू शकला. आपल्या पाल्याच्या अभ्यासातील प्रगतीबाबत पालक आणि शिक्षकांत चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे. आपला पाल्य नियमित अभ्यास करतो का ?, तो नियमित क्लासला, महाविद्यालयात उपस्थित असतो का ?, हेही पालकांनी पाहणे गरजेचे असते. आपण केलेले कष्ट, मेहनत आपल्या मुलाने करू नये अशी पालकांची धारणा असते. आई - वडिलांनी आपल्या पाल्याना मित्रत्वाच्या भावनेने विश्वासात घेऊन मार्गदर्शन केले पाहिजे,असे मोटेगावकर यांनी सांगितले.
यावेळी 'राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२० च्या अंमलबजावणीची दिशा ' या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना गोविंद नांदेडे यांनी मुख्याध्यापकांनी आपल्या जीवनात कसल्याही धोरणाला बळी पडू नये असे सांगितले. शिक्षक हा राष्ट्रनिर्मात्याची भूमिका पार पाडत असतो. राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीने पाठांतराने विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊ शकते. वर्ग अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टीची नक्कल करण्याची गरज पडत नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरणात पाचही वर्ग एकत्रित आणले गेले आहेत. त्याचा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढीसाठी खूप उपयोग होणार आहे. ग्रामीण भागाचा, खेड्यापाड्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर सर्वच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन शिक्षण दिले पाहिजे. चांगल्या शिक्षणाने, मार्गदर्शनाने विद्यार्थी शिकून मोठा अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही व आपली शाळाही स्मार्ट होईल,असा विश्वास नांदेडे यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी, राज्याच्या विविध भागातून आलेले मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0