महान-मानवतावादी-युगपुरुष-राष्ट्रसंत-गाडगेबाबा
महान-मानवतावादी-युगपुरुष-राष्ट्रसंत-गाडगेबाबा
महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यांनी समाजात अनेक चालीरीती, भेदभाव, अंधश्रद्धा, खुळ्या समजुती वगैरेंच्या संदर्भात काही कार्य केल्याचे सांगितले जाते. परंतु संत गाडगेबाबा हे असे एक संत होऊन गेले जे केवळ या सगळ्या विरुद्ध लढतच नव्हते तर आपल्या कार्यातून, वाणीतून समाजाची क्रांतीकारी पुनर्रचना करण्यासाठी आपली ऐतिहासिक पावले टाकत होते. ते कधीच कथनी आणि करणीत फरक करणारे नव्हते. लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे, महान म्हणावे किंवा संत म्हणावे यासाठी प्रचारकी पद्धतीचे काम करीत नव्हते. ते अशिक्षित पण एक वैचारिक योद्धा होते. युद्धखोर कीर्तनकार होते. एक वैश्विक प्रबोधक. मानवतावाद मांडणारे एक थोर युगपुरुष. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा बाबत असणारे दोष दूर करण्यासाठी गावोगावी भजन, कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले. भजन, कीर्तन आणि त्यातून उपदेश हाच त्यांचा ध्यास होता. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा, सोयऱ्याधायऱ्यांचा त्याग केला. सगळी माणसे हेच आपले सगेसोयरे, हे विश्वचि आपले घरं,' असे मानून ते वावरू लागले. गावोगाव भजन-कीर्तन करत ते फिरू लागले. यातून मानवतावाद मांडू लागले. लोकांत मूल्यात्मक बदल घडून आला पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. संत गाडगेबाबा यांनी घरादाराचा त्याग करून पारमार्थिक मार्गाचा स्वीकार केल्यावर त्यांनी अतिशय साधेपणाने जीवन जगावयास प्रारंभ केला. त्यांचा वेष म्हणजे अंगावर एक फाटकीतुटकी गोधडी आणि हाती एक फुटके मातीचे गाडगे असा होता. त्यामुळे लोक त्यांना 'गोधडे बुवा' किंवा ‘गाडगे बाबा' या नावाने ओळखत असत. त्याच नावाने ते सर्वदूर लोकांना परिचित झाले. संत गाडगेबाबा संसारिक जीवनातून विरक्त होऊन पारमार्थिक मार्गाकडे वळलेले संतपुरुष होते. असे असले तरी सर्वसामान्य समाजाकडे मात्र त्यांनी पाठ फिरविली नव्हती. स्वतःच्या संसारापेक्षा सर्व समाजाच्या संसाराची काळजी वाहणारे ते खरेखुरे राष्ट्रसंत होते. महान युगपुरुष होते.
आजकाल सर्वच महान पुरुषांना जातीच्या कोंदणातून पाहिल्या जाते. इथल्या राजकीय आणि त्यासोबतच जातीय व्यवस्थेने सगळ्याच महापुरुषांच्या जोडीला जात जोडली. त्यानुसार राजकीय समाज उभा केला. इथल्या तमाम जात मानसिकतेच्या लोकांनी महापुरुषांना, त्यांच्या विचारांना आणि पुतळ्यांना जातीचा मुलामा दिला. दंगली घडवून आणल्या. लोकांनीही त्यांना आपल्या जातीच्या मर्यादेतच नांदवले. तशा संघटना काढल्या. पक्षीय राजकारण केले आणि समाजकारणही. महापुरुष आणि त्यांचे पुतळे घेऊन आपल्या जातीची प्रतिकं बनवली आणि आपली जातीय अस्मिता प्रखर केली. यामुळे जातीय व्यवस्था अधिक बळकट झाली. पुरोगामीत्वाचे ढोल वाजविणारेही जातीव्यवस्थेचे समूळ उच्चाटन व्हावे या कार्यक्रमाचे नसतात. तसे व्हावे असे त्यांना फक्त वाटते. अगदी प्रामाणिकपणे त्यांना वाटते. ते सगळेच आपल्या जातीला, पोटजातीला आणि त्यासोबत अस्तित्वात असलेल्या धर्माला चिकटून असतात. आपली जात आणि आपली अस्मिता इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाची वाटते. आपल्या संघटना महत्त्वाच्या वाटतात. आपण आपले झेंडे अधिक उंचावर नेऊन नाचवावे वाटतात. तसे ते सारेच कृतीत आणले जाते. सरकारनेही आपल्या जातीसाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटते. अशा किचकट आणि कठीण परिस्थितीत संत गाडगेबाबा यांना जातीच्या चिखलात बरबटून ठेवले नसते तर नवलच घडले असते. पण त्यांच्या बाबतीत जे घडले ते फार भयंकर घडले आहे. शब्दांशब्दांतून मानवतावाद मांडणाऱ्या या वैश्विक प्रबोधकाला आपण सगळ्यांनीच जातीच्या विहिरीत ढकलून दिले आहे. आपल्यापासून दूर केले आहे किंवा आपण त्यांच्याजवळ पोहोचू शकलो नाहीत. परंतु गाडगेबाबा तिथेच गटांगळ्या खाणारे कुणी ऐरेगैरे नत्थु खैरे नाहीत. ते योद्धा कीर्तनकार होते, हे प्रारंभीच म्हटले आहे. ते आजच्या संतांसारखे प्रसिद्धीलोलुप, साधेसुधे किंवा व्यावसायिक संत नव्हते. ते आता नाहीत म्हणजेच आजही त्यांच्या वैचारिक तत्वज्ञानाने आपल्यात जिवंत आहेत. आपणच पसरवलेल्या वैचारिक प्रदुषणाविरोधात ते लढत आहेत. आपल्या पाठीवर नव्हे तर गंजत चाललेल्या मेंदूवर काठीचा रट्ठा मारणारे ते लोकशिक्षक आहेत. ते निष्काम कर्मयोगी आहेत.
महाराष्ट्रामध्ये पंढरपूर , नाशिक, देहू, आळंदी या तीर्थक्षेत्र ठिकाणी बाबांनी स्वतः राबून, कष्ट करून, मदत किंवा दान मागून धर्मशाळा बांधल्या. काही नद्यांवर घाट बांधले, पाणपोया उभारल्या. गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रे, सदावर्ते सुरू केली. मुलांसाठी शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे उभी केली. दुःख दिसले की बाबा तिथे धावून जात. दुष्काळ पडला, लोक अन्नावाचून तडफडू लागले की बाबा त्या ठिकाणी जाऊन मदत करीत. ते स्वतः राबायचे आणि लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायचे. त्यांतून अन्न, वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू उपलब्ध होत असत. ओस पडलेली गावे उभी राहायची. त्यांनी कधीही जात मानली नाही. त्यांचा देव कोणता होता? अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी असलेले लोक त्यांचे देव होते. रंजल्या-गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा होती. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी,
उघड्यानागड्यांना वस्त्र, बेघरांना आसरा, अंध, पंगू रोगी यांना औषधोपचार करण्यासाठी मदत, बेकारांना रोजगार मिळवून देण्यासाठी मदत, पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींच्या लग्नाची व्यवस्था, दुःखी व निराशांना हिंमत, गोरगरिबांना शिक्षण घेण्यासाठी मदत अशी बाबांच्या जगण्याची दशसूत्री होती. लोकांना ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने उपदेश करीत असत. चोरी करू नये, कर्ज काढून सणवार साजरे करु नये. कर्ज काढून आपल्या गळ्याला सावकारी पाश अडकवून घेऊ नये, व्यसनाधीन होऊन आपला सुखी संसार उद्धवस्त करुन घेऊ नये, देवधर्म किंवा कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडून, नवस बोलून मुक्या प्राण्यांची हत्या करू नये, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नये ही शिकवण ते आपल्या कीर्तनातून देत असत. माणसाने माणसांशी माणसासारखेच वागावे, सर्वांशी प्रेमाने व बंधुभावाने व्यवहार करावा, अडल्या नडलेल्यांची, रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करावी, भूतदया म्हणजेच परमेश्वराची पूजा होय असा उपदेशही ते लोकांना करीत असत. माणसाला संसारात राहूनही देवभक्ती करता येते, असे त्यांचे सांगणे असे. नैतिक मूल्यांची जपणूक, मानवता आणि परोपकार यांचे धडे त्यांनी आपल्या कीर्तनातून लोकांना दिले. महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड व्यासपीठ' असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले होते. ते आजही आपल्याला अभ्यासता येते. सर्वार्थाने समजून घेता येते.
कीर्तन हेच बाबांचे खरे सामर्थ्य होते. सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात असे आचार्य अत्रे त्याकाळी म्हणत असत. कधी कधी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाबांच्या कीर्तनाला हजेरी लावत असत. वास्तविक गाडगे बाबा अनेक राजकारण्यांना भेटत असत. पण डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. याचे कारण समाजसुधारणेचे जे कार्य ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जनतेला उपदेश करून करत होते, तेच काम डॉ. आंबेडकर राजकारणातून करत होते. गाडगे बाबांच्या कार्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथाकथित ऋषी-संतांपासून दूर राहून गाडगे बाबांचा आदर करत असत. गाडगे बाबांना ते वेळोवेळी भेटत असत आणि समाजसुधारणेच्या मुद्द्यांवर त्यांचा सल्ला घेत असत. कारण शिक्षणाचे महत्त्व ते कीर्तनातूनच अगदी प्रभावीपणे मांडत असत. ते बाबासाहेबांच्या शिक्षणाचा आणि कर्तृत्वाचा उल्लेख आपल्या कीर्तनातून करीत असत. विद्या शिका आणि गरिबांना विद्या मिळवण्यासाठी मदत केली पाहिजे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते, आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते. त्यासाठी अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकवा असे ते सांगत. शिक्षणाविषयी गाडगेबाबांचे मत अगदी स्पष्ट होते. तसेच देवाबद्दलही त्यांची भूमिका अगदी स्वयंस्पष्ट अशी होती. दगडात देव नाही तर,देव माणसात आहे. धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका. दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बापच आहेत. अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी लोकांची, रंजल्या - गांजलेल्यांची सेवा हीच देवपूजा होय, असे ते मानत असत. पूजाअर्चा हे सगळे थोतांड आहे असे म्हणत; म्हणूनच त्यांच्या कीर्तनानंतर होणाऱ्या आरतीला ते थांबत नसत. गाडगेबाबा हे मानवतावादी मूल्यांची रुजूवात करणारे संत होते. दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पुढे करा असे ते सांगत. ते म्हणायचे की दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय, सुखाचे किरण दिसत नाहीत. म्हणूनच श्रमाला त्यांनी प्राधान्य दिले. ते वेळेलाही महत्त्व देत असत. जो वेळेवर जय मिळवतो, तो जगावरही जय मिळवतो. अशी त्यांची धारणा होती.
संत गाडगेबाबांनी समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केले. ते एक महान तत्त्वज्ञानी, द्रष्टे, समाज सुधारक, प्रबोधनकार होते. गाडगेबाबांनी सहभोजनाच्या माध्यमातून 'जातीय सलोखा' निर्माण करण्याचे फार मोठे काम केले. त्यांनी 'शेतकऱ्यांच्या मुक्तीचे आंदोलन' सुरू केले आणि बऱ्याच शेतकऱ्यांना या पासून मुक्त केलं. वाईट चालीरिती परंपरा रूढी बंद कराव्या असं ते नेहमी आवाहन करायचे. शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा याकरिता विविध शिक्षण संकुले काढली. शिक्षण संस्थांना मदत केली. अंधश्रद्धा निर्मूलन हे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. हुंडा प्रथेवर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात कठोर टीका केली. हुंडा प्रथा बंद व्हावी, याकरिता प्रयत्न केले. संत गाडगे बाबा समाजातील अंधश्रद्धा, जातीयता, आणि शोषणाविरुद्ध लढले. त्यांनी समाजातील भेदभावाला विरोध केला आणि समता, सहिष्णुता, आणि बंधुता यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपले विचार पोहोचवले. ते त्यांच्या कीर्तनात स्वच्छता, शिक्षण, आणि परोपकाराचे महत्व स्पष्टपणे अधोरेखित करत असत. संत गाडगे बाबांचे विचार आणि कार्य आजही प्रेरणादायक आहेत. त्यांच्या स्वच्छता मोहिमा, शिक्षणाविषयीचे योगदान, आणि समाज सुधारणा चळवळी यांचा प्रभाव महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विशेषतः जाणवतो. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याचा सन्मान करून स्वच्छतेसाठी “संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान” सुरू केले. हे अभियान सुरू झाले आणि स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण झाली. या माध्यमातून सरकारने घरोघरी संडास बांधून दिले. नंतर हागणदारीमुक्त गाव ही संकल्पना पुढे आली. यातून संत गाडगेबाबांचे नाव अमरावती विद्यापीठाला दिले असले तरी ते स्वच्छतेचे महान पुजारी बनले. सरकारने स्वच्छता हाच शब्द उचलला.
स्वच्छतेचे महान पुजारी, उपासक वगैरे संबोधने संत गाडगेबाबा यांच्या नावाआधी जोडले गेले व नंतर स्वच्छता हा शब्द कायमचा चिटकवण्यात आला. कारण गाडगेबाबा ज्या जातीत जन्माला आले, तो धोबी जातसमुह आहे. धोबी लोकांना परीट किंवा वरटी संबोधले जाते. ह्या जातीचे काम पिढ्यानपिढ्या कपडे धुण्याचे होते. म्हणजेच स्वच्छतेचेच काम होते. त्यांनी ते समाजव्यवस्थेचा भाग म्हणून केले. आजही काही ठिकाणी ते केले जाते. आजही परीट या जात समुहाला भारतीय समाजातील गावगाड्याच्या संकल्पनेतच आनंदाने नांदावे वाटते. या विहिरीच्या बाहेर येण्याची अनेकांची इच्छा नाही. तिथेच गटांगळ्या खात त्यांना रहावे वाटते. परंतु एकवेळ बुडून मरण्याचे ते सहज सूचन आहे तरीही आपण जगतो आणि जगतच राहतो. आपण विचार करीत नाही की, गाडगेबाबांसारख्या संताला स्वच्छतेतच म्हणजे जातीतच बांधून ठेवले आहे. सरकारने हे काम अगदी सोयिस्कर केले आणि जनतेनेही ते मान्य केले. बाबा गावघाण दूर करण्याबरोबरच मन घाण दूर करण्यासाठी प्रयत्नरत होते. इतर सगळे कार्य बाजूला ठेवून फक्त स्वच्छताच पुढे आली. यामुळे त्यांची सकल जात जी धोबी ( कपडे धुण्याचा कामाची) होती; गाडगेबाबा हे त्याचेच प्रतिक बनत गेले. गाडगेबाबा हे स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून जुन्या समाजव्यवस्थेत म्हणजेच वर्णव्यवस्थेतील जातीला जो स्तरांक मिळालेला होता, त्याच क्रमांकांवर फेकले गेले. हे पातक सरकारसह सगळ्यांनीच केले. कारण आपण एकत्र येत नाही आणि विचार करीत नाही. ज्यांनी कुणी गाडगेबाबांवर चार दोन पुस्तके लिहिली त्यांनीही नव्या समाजरचनेचा सिद्धांत मांडणारे गाडगेबाबा असे म्हणून पुढे आणले नाही. जे काही गाडगेबाबा पुस्तकात आहेत ते तिथेच राहिले. त्यांच्या अनुयायांनी किंवा वैचारिक वारसदारांनी ज्या पद्धतीने गाडगेबाबांचे विचार पुढे घेऊन जायला पाहिजे होते तसे ते होऊ शकले नाही. गाडगेबाबांची प्रतिमा ही स्वच्छता आणि खराटा या दोहोंभोवतीच फिरत राहिली. गाडगेबाबांची प्रतिमा आणि खराटा हे आजच्या लोकांनी चमकोगिरीचे साधन केले. बाबांनी स्वच्छतेचे महान कार्य तर केलेच परंतु ते काही मुख्य नव्हते. त्यामुळे त्यांना खराट्यापासून दूर करता आले नाही तरी तो खराटा मात्र बाजूला ठेवून देता येतो. ज्यांना त्याची गरज भासेल त्यांनी पुढे होऊन खराटा उचलावा आणि सारा गाव झाडून स्वच्छ करावा. आता कोणताही एकलव्य आपला अंगठा कापून देणार नाही आणि कोणताही गाडगेबाबा हातात खराटा घेऊन तुमचं गाव स्वच्छ करणार नाही. ते तुमचं तुम्हालाच करायचं आहे, ठरवायचं आहे. हाच विचार घेऊन पुढे जायचे आहे, धन्यवाद!
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025
Comments 0