धुळीत माखलेल्या बायांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच खरा महिला दिन..
धुळीत माखलेल्या बायांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच खरा महिला दिन..
दयानंद शिक्षण संस्था, लातूर व सनराईज बहुउद्देशीय सामाजिक संस्था,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने, जागतिक महिला दिन दयानंद सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमण लाहोटी व सचिव श्री. रमेश बियाणी यांच्या संकल्पनेतून श्रीमती दीपा पवार यांचा तरुण विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रम दयानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात महिलांनी नऊवारी साडी परिधान करून योग सादरीकरणाने करण्यात आली.
जागतिक महिला दिनानिमित्त `पोलादी बाया' या पुस्तकाच्या लेखिका श्रीमती दीपा पवार यांचे परखड व्याख्यान दयानंद सभागृहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड होते तर प्रमुख उपस्थिती सनराईज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्षा श्रीमती नंदिनी पडिले, सामाजिक कार्यकर्ते श्री सुपर्ण जगताप, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, दयानंद फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.क्रांती सातपुते, विधी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. पुनम नथानी, दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अंजली जोशी व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ दिलीप नागरगोजे यांची होती.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांनी असे प्रतिपादित केले की, दयानंद शिक्षण संस्था शैक्षणिक उपक्रमाबरोबर सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमी अग्रेसर असते. दयानंद शिक्षण संस्था अंतर्गत येणाऱ्या मुलींच्या वसतिगृहातील सर्व मुलींसाठी हे व्याख्यान वैचारिक पर्वणी असून याचा मुलींच्या भावी आयुष्यासाठी नक्कीच उपयोग होईल.
श्रीमती दीपा पवार यांनी महिला दिनानिमित्त दयानंद सभागृहात उपस्थित सर्व महिला, विद्यार्थी व दयानंद शिक्षण संस्थेमधील प्राध्यापक व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले मनोगतात त्यांनी असे प्रतिपादन केले की, जागतिक महिला दिन हा केव्हा साजरा होईल जेव्हा धुळीत माखलेल्या बायांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळेल. सर्व महिलांनी लिहिते होणे आवश्यक आहे जेव्हा त्या लिहू लागतील तेव्हाच क्रांती घडून येईल.कारण चार ओळी लिहिण्यासाठी विचारांची गरज असते आणि त्याच विचारावर क्रांतीची मशाल पेटली जात असते. शेवटच्या बेंचवर बसणारे कूल वाटतात, मस्ती करतात पण तेच खरे क्रांती करतात. भटक्या जमातीतील मुले शाळेतील शेवटच्या बेंचवर बसलेले असतात; पण सामाजिक योगदानामध्ये त्यांचीच क्रांती महत्त्वाची असते. महिलांची ओळख केवळ भावनिक न होता पोलादी बाया अशी निर्माण होणे गरजेचे आहे. नैसर्गिकरित्या बाळाला दूध पाजणे यातच खरे ज्ञान सामावलेले आहे. लाजेचा शोध घेण्यासाठी माझा प्रवास नसून नारीच्या नेतृत्वात अशक्य गोष्टी शक्य करून दाखविण्यासाठी आहे.पोलादी बाया हे पुस्तक वेदना आणि यतना यासाठी नसून कणखरपणाचे प्रतीक आहे. तुम्ही जर रडत बसाल तर कधीच नेतृत्व करणार नाही. असा विचार या पुस्तकांमधून मांडलेला आहे. स्त्री-पुरुषांची मैत्री ही ताकद आहे; पण त्या मैत्रीमध्ये लोकशाही असणे गरजेचे आहे. महिला दिन साजरा करताना या बदलाच्या प्रक्रियेत सर्व समाज सुधारकांनी ज्या क्रांती केल्या आहेत त्या सर्व क्रांत्या किशोरावस्था मध्येच केलेले आहेत.
महिला दिनी बायांनी सर्व चाकोऱ्यातून पुढे येऊन आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उभे राहण्याचा दिन आहे. सर्व महिलांनी आपला संघर्ष समोर ठेवून पुढे येणे गरजेचे आहे. आज वसतिगृहामध्ये राहणाऱ्या मुली, पालक सभेला जाणाऱ्या महिला ही एक नवी क्रांतीच आहे. महिलांनी घरामध्ये केलेल्या कपभर चहा मध्ये सुद्धा तार्किकता, विज्ञान तत्त्वज्ञान आणि व्यवस्थापनाच्या सर्व शाखा लपलेल्या आहेत. श्रमाचे विभाजन लिंगाच्या आधारावर न करता त्याला आव्हान देऊन भेदभाव बाजूला सारून ते सर्व स्तरातून नष्ट करणे गरजेचे आहे. ग्रामीण व्यवस्था बदलण्यासाठी महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे.शेती मधला असो किंवा पर्यावरणातला बदल असो सर्व स्त्रियांनी यामध्ये अभिव्यक्त होणे महत्त्वाचे आहे. स्त्रीला वैचारिक प्रगल्भता आपल्या कुटुंबातून आलेली असून त्यातून स्त्रीने अंधश्रद्धा बाजूला सारून सामाजिक विषमतेमधून बाहेर येत सर्व दुःखाचे निरसन करावे. भारतीय संविधानाने सर्व महिलांना आत्मसन्मनाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. आपल्या लैंगिक मर्यादा मधून बाहेर पडून जगाचे नेतृत्व करण्यासाठी महिलांना सक्षमीकरणाची गरज आहे.
कार्यक्रमाची सुरूवात संगीत विभाग प्रमुख डॉ. देवेंद्र कुलकर्णी, प्रा. सोमनाथ पवार प्रा.शरद पाडे यांनी महाराष्ट्र गिताने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद कला महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.अंजली जोशी यांनी केले. सूत्रसंचालन दीपरत्न निलंगेकर यांनी केले तर आभार डॉ.दिलीप नागरगोजे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अशोक नारनवरे , डॉ.दशरथ भिसे, प्रा.पंचशील डावकर , डॉ बी आर पाटील, डॉ.सितम सोनवणे, डॉ. गणेश गोमारे,प्रा. सुरेश क्षीरसागर, प्रा दशरथ ननवरे, डॉ.सुधीर गाढवे, प्राध्यापिका अंजली बनसोडे, श्री.रमेश चिल्के, श्री. सुपर्ण जगताप, श्रीमती नंदिनी पडिले यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास नारी प्रबोधन मंचच्या अध्यक्षा श्रीमती सुमती जगताप, पर्यावरण तज्ञ श्री अतुल देऊळगावकर व सौ देऊळगावकर श्री शिवाजीराव शिंदे ,डॉ.अनिल जायभाये उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0