सरकार विक्रमी बहुमताने स्थापन झाले.
सरकार विक्रमी बहुमताने स्थापन झाले.
आजवर कोणत्याच सरकारला मिळाले नाही इतके विक्रमी बहुमत या सरकारला महाराष्ट्रातील मतदारांनी दिले आहे. या सरकारचा शपथविधी समारंभ नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर माननीय एकनाथ शिंदे व माननीय अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ३९ आमदारांनी देखील नागपुरात मंत्रीपदाची शपथ घेतली. नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येताच सरकार ॲक्शन मोड मध्ये आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व विभागाची बैठक घेऊन सचिवांना पुढील शंभर दिवसांचा कार्यक्रम आखण्यास सांगितले आहे.
जनातेच्याही या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. एक तरुण म्हणून मला तरुणांचे प्रश्न महत्वाचे वाटतात. नव्या सरकारने तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करायला हवेत. कारण गेल्या चार पाच वर्षात राज्यात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. शिक्षण व गुणवत्ता असूनही तरुणांच्या हाती काम नाही त्यात आर्थिक मंदी आणि कोरोणाने अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सरकारी नोकरभरती बंद आहे. रोजगार नसल्याने राज्यातील तरुण नैराश्याच्या गर्तेत अडकला आहे. या तरुणांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढायचे असेल तर रोजगार निर्मितीसाठी सरकारने ठोस प्रयत्न करायला हवेत.
बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी उद्योगधंदे वाढीला लागतील यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत. मुख्यमंत्र्यांनी नोकर भरतीचे आश्वासन दिले आहे ही आनंदाची बाब असली तरी ही नोकरभरती कंत्राटी नको तर कायम स्वरूपाची हवी. मागील सरकारने नोकर भरतीचे दिलेले आश्वासन हवेतच विरले. या सरकारने तरी नोकर भरतीचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे.
राज्यातील ४० टक्के लोकसंख्या १८ ते ४५ या वयोगटातील आहे या तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. मेहनत करण्याची त्यांची तयारी आहे. त्यांच्या मेहनतीचा आणि ऊर्जेचा सरकारने उपयोग करून घेतल्यास महाराष्ट्र देशातील नंबर १ चे राज्य बनेल यात शंका नाही. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने उद्योगधंदे वाढीला लागतील यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत. मागील काळात महाराष्ट्रातील काही उद्योग गुजरातमध्ये गेल्याचे आपण पाहिले आहे आता तरी महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी. उद्योगधंद्यात महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर ठेवण्याचे मोठे आव्हान या सरकारपुढे आहे. महाराष्ट्रात मोठे उद्योग आले तर रोजगारी कमी होऊन राज्याची अर्थव्यवस्था गतिमान होईल.
महायुती सरकारने जे विक्रमी बहुमत मिळवले आहे त्यात राज्यातील लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मते दिली आता सरकारनेही लाडक्या बहिणींना विसरु नये. लाडक्या बहिणींना दिलेले २१०० रुपयांचे आश्वासन पूर्ण करावे. त्यासोबतच महागाई करून दाजिंनाही दिलासा द्यावा. लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे पाठवले म्हणजे सरकारचे काम संपले असे नाही तर लाडक्या बहिणींच्या संरक्षणाची जबाबदारी देखील सरकारने घ्यायला हवी. राज्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. तीन वर्षाच्या चिमुरडी पासून साठ वर्षाच्या आजीपर्यंत सर्व वयोगटातील महिला अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. सरकारने महिला अत्याचाराच्या घटनांना आळा घालून आणि नराधमांना कठोर शिक्षा द्यावी. मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले शक्ती विधेयक या सरकारने मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी.
महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. मागील काही काळापासून राज्यातील शेतकरी सरकारी धोरणावर नाराज आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. शेतकऱ्यांसोबत कष्टकरी, कामकरी आणि व्यापारी वर्गाचे देखील प्रश्न सरकारने प्राधान्याने सोडवावेत.
जनतेचा सर्वाधिक पैसा शिक्षण आणि आरोग्यावर खर्च होतो. या सरकारने जनतेचा शिक्षण आणि आरोग्यावर होणारा खर्च कमी करावा. राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि नागरिकांना निरोगी आरोग्य लाभेल या दृष्टीने सरकारने धोरणे आखावित. सरकारने सर्वांना परवडेल अशा माफक दरात आरोग्यसेवा पुरवावी. के जी ते पी जी शिक्षण मोफत करावे.
या सरकारने इंदु मिल मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांच्या कामाला गती द्यावी. या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी. जलसिंचन, नदी जोड सारखे प्रकल्प राबवावेत.
सरकारने प्रशासनातील भ्रष्टाचार मोडून काढावा. राज्यातील स्त्रिया, मुलींना सुरक्षित वाटेल असे कायद्याचे राज्य स्थापन करावे. जाती - जातीत, धर्मा - धर्मात तणाव वाढत आहे. हा तणाव कमी करून राज्यात सौहार्दाचे वातावरण निर्माण करावे. एकूणच या सरकारने भय, भूक आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र निर्माण करावा.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0