जागतिक ग्राहक दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम
जागतिक ग्राहक दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम
लातूर, दि. 20 : ग्राहक हा राजा आहे, असे म्हटले जाते. प्रत्येक नागरिक हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ग्राहकच असतो. त्यांची फसवणूक होवू नये, यासाठी त्यांना ग्राहक संरक्षण कायद्यानुसार मिळालेल्या हक्कांची जाणीव करून देणे आवश्यक आहे, असे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अमोल गिरमे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके होते.
जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य वैशाली बोराडे, विधिज्ञ अॅड. अनिल जवळकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दत्ता मिरकले पाटील, प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रल्हाद तिवारी, शिवशंकर रायवाडे, बालासाहेब शिंदे, विपुल शेंडगे, शामसुंदर मानधना, इस्माईल शेख, संगमेश्वर रासुरे, मंजुषा ढेपे, व्यंकट कुलकर्णी, सतीष देशमुख, रंजना मालुसरे, एन. जी. माळी, गीता मोरे, नितीन कल्याणी, अभिजित औटे यावेळी उपस्थित होते.
ग्राहक संरक्षण कायद्याविषयी जनजागृती होण्यासाठी जागतिक ग्राहक दिनानिमित्त करण्यात आलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना कायद्याची माहिती मिळेल, तसेच आपली फसवणूक झाली तर काय केले पाहिजे, याबाबत जाणीव जागृती होण्यास मदत होईल. सध्या ई-कॉमर्स संकेतस्थळावरून ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. या माध्यमातूनही ग्राहकांची फसवणूक होवू शकते. त्यामुळे ग्राहकांनी याबाबत अधिक सजग होणे गरजेचे आहे. एखादी वस्तू ऑनलाईन स्वरुपात खरेदी करताना त्याबाबत संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. तरीही फसवणूक झाल्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागण्याचा हक्क ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार नागरिकांना मिळाला असल्याचे श्री. गिराम म्हणाले.
ग्राहकांना सजग करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित उपक्रम उपयुक्त ठरेल. या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीमुळे नागरिकांमध्ये आपल्या हक्कांबाबत जागृती निर्माण होईल, असे प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके म्हणाले.
प्रास्ताविकामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांनी जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक जनजागृती पंधरवडा अंतर्गत जिल्ह्यात कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच 24 डिसेंबर रोजी जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयात ग्राहक हक्काबाबत माहिती दिली जाणार असल्याचे सांगितले.
पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी सायबर सुरक्षाविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य रंजना पाटील, राजेश भोसले, अभिजित औटे, दत्ता मिरकले पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री. धायगुडे यांनी केले, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
लातूर शहर महानगरपालिका, महावितरण, अन्न व औषध प्रशासन, कृषि विभाग, आरोग्य विभाग, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आदी विभागांमार्फत उभारण्यात आलेल्या दालनांना यावेळी मान्यवरांनी व नागरिकांनी भेटी देवून माहिती घेतली.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0