लोकशिक्षणाचा कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा
लोकशिक्षणाचा कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा
बुद्ध, कबीर, फुले व आंबेडकर या महामानवांचा उपदेश व तत्त्वज्ञान जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत बहुजन समाजातील अशिक्षिक जनतेपर्यंत आपल्या कीर्तनाद्वारे सांगणारे, अज्ञानी, भोळ्या भाबड्या शोषित, पिडित व तळागाळात खितपत पडलेल्या जनतेच्या व्यथा, वेदनांना आपल्या कीर्तनाद्वारे वाचा फोडणारे, धार्मिक रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड, देवधर्म, विषमता, अनिष्ट प्रथा, जातीभेद, हिंसा व हुंडा पद्धती यावर आसूड ओढणारे हीन-दीन, पददलित जनतेला प्रबोधनाचा डोस पाजून माणूसपण मिळवून देणारे कर्मयोगी, वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा म्हणजे डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होत. डेबूचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी परीट घराण्यात झाला. वडील झिंगराजीचा मृत्यू झाल्यानंतर मातोश्री सखुबाई डेबूला घेऊन मुर्तिजापूर तालुक्यातील दापूरा या गावी भावाकडे रहावयास गेल्या. मामा चंद्रभानजीकडे डेबू लहानाचा मोठा झाला. तेथेच सन १८८२ मध्ये कुंताबाईसोबत लग्न झाले. पुढे त्यांना अलोका व कलावती या दोन मुली आणि मुग्दल हा एक मुलगा झाला.
कीर्तन हे गाडगेबाबांचे खरे सामर्थ्य. आपल्या खेडवळ लाडक्या वर्हाडी बोलीमध्ये तासन्तास ते हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन ठेवत. काव्य आणि विनोद यांचा धबधबा त्यांच्या मुखातून वहायचा. कीर्तनाचा विषय एकच- गरीबांचा आणि दलितांचा उद्धार! बाप्पं हो! देव तीर्थात किंवा मूर्तीत नाही, तो तुमच्यासमोर दरिद्री नारायणाच्या रुपाने प्रत्यक्ष उभा आहे. त्यांचीच प्रेमाने सेवा करा, भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी, उघड्यानागड्यांना वस्त्र तर गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत करा. बेघरांना आश्रय द्या, अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार करा, दुःखी व निराधारांना हिंमत द्या, बेकारांना रोजगार तर पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना अभय द्या. गरीब तरुण-तरुणींचे लग्न करा, सेवेसारखा दुसरा धर्म नाही. हीच खरी भक्ती व देवपूजा आहे. बाबांनी आयुष्यभर हेच समाजकार्य केले.
कीर्तनाची सुरुवात, शेवट व अधुनमधून लोक कंटाळवाणे झाल्याचे लक्षात आल्यावर श्रोत्यांना दोन्ही हात वर करावयास लावून टाळ्यांच्या गजरात गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला असे म्हणवून घेत असत. हे त्यांचे आवडते भजन होते. गोंगाटात सुद्धा त्यांचे भजन वर उचंबळून येई. वातावरण दुमदुमत असे. स्त्री-पुरुष आणि मुले बाबांच्या भोवती जमायची आणि टाळ्यांच्या तालावर गोपाला, गोपाल देवकीनंदन गोपाला हे भजन गायची. हा त्यांच्या भजनाचा आत्मा होता. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी २० ते २५ कि.मी. अंतरावरुन मोठ्या प्रमाणात जनता यायची आणि मौलिक उपदेश ऐकून व तृप्त होऊन आपापल्या गावाला परत जायची. डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रल्हाद केशव अत्रे व प्रबोधनकार ठाकरे इ. हे त्यांचे कीर्तन आवर्जुन ऐकत असत. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा कधीकधी त्यांच्या कीर्तनात हजेरी लावत असत. संत गाडगेबाबांना अख्ख्या महाराष्ट्रात आणि बाहेरही सर्वजण गाडगेबाबा म्हणून ओळखत. त्यांच्याजवळ पाणी पिण्यासाठी नेहमी गाडगे असायचे यावरुन त्यांचे नाव गाडगे महाराज असे पडले. त्यांचा मुक्काम एका ठिकाणी कधीच नसायचा. संपूर्ण खेड्यापाड्यात गावोगावी एका दिवसात ४०-५० कि.मी. अंतर पायीच भटकंती चालू असे. ज्या गावात रात्र झाली तेथे एक रात्र मुक्काम करुन चावडीवर किंवा सार्वजनिक ठिकाणी म्हणजे मारोतीच्या मंदिरासमोर कंदिलाच्या उजेडामध्ये प्रबोधनपर कीर्तन करीत असे.
बाबांना देवतांचा बाजार मूळीच मान्य नव्हता. ते म्हणत, देव कधी नवसाला पावत नाही, देव कधी कुणाला डोळ्यांनी दिसत नाही, मनुष्याला जी बुद्धी मिळाली तिचा विकास अवश्य करा. मुलांना लहानाचे मोठे करा व खूप शिकवा आपल्या बाबासायबावानी. पशूच्या हत्या करुन दगडाच्या देवाला बळी देऊ नका, त्यांनाही आपल्यासारखा जिव असतो, हिंसा करु नये व प्राणीमात्रावर प्रेम करा असा संदेश त्यांनी अनेकदा कीर्तनातून दिला. संत गाडगेबाबांनी दगडांच्या देवाला महत्त्व न देता माणसालाच जास्त महत्त्व दिलेले असून मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असे म्हटले आहे. ते मूर्ती पुजेच्या प्रखर विरोधात होते. तसेच अस्पृश्यता, जातीभेदाच्या विरोधात होते. कीर्तनातून बाबा सांगत, बाप्प हो! प्रपंच निटनेटका करा, पण देवाले ईसरु नका, सर्वांचा देव एकच आहे. आपण सारी एकाच देवाची लेकरं आहोत. मानवता हीच आपली जात असं ते आवर्जुन सांगत. आपला हा गरीब, आडाणी समाज परिवर्तीत व्हावा असे त्यांना मनापासून वाटत असे. त्यांना त्याबद्दल सतत आस्था व तळमळ होती.
अंधश्रद्धा, हुंडापद्धती, देव-धर्म, कर्मकांड, विषमत, रुढी, परंपरा, जातीभेद व हिंसा याविरुद्ध त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत घणाघाती हल्ले केले. ते शिक्षणाचे पुरस्कर्ते होते आणि हुंडा विरोधी होते. कर्ज काढून लग्न थाटात करणे, बारसे आणि वाढदिवसावर अमाप खर्च करणे हे त्यांना अजिबात मान्य नव्हते. त्यामुळे आपल्या बहुजन समाजाची धुळधान होते आणि आपला होणारा विकास खुंटतो असं ते सांगत असत. लहान मुलंाना ते नेहमीच म्हणत असत, मुलांनो तुम्ही खूप शिका, डॉ. आंबेडकरावानी व डॉ. पंजाबरावांसारखं मोठे व्हा, आणि भारताचं नाव जगात उज्वल करा. माया लेकरांनो, शिक्षणाशिवाय मानवजीवन हे पशूतुल्य आहे. फुले-आंबेडकरांना शिक्षणाची महत्त्व कळले म्हणूनच ते महान झालेत. तसेच तुम्ही पण खुप-खूप शिका, आपल्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना कीर्तनातून वारंवार असा मौलिक संदेश-उपदेश देत असत.
संत गाडगेबाबांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत प्रेम होते. शिक्षणाची महती सांगताना ते कीर्तनातून जनतेला नेहमीच सांगत असत की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यायच्या पिढ्यान् पिढ्यानं झाडू मारायचं काम केलं. त्यायच्या वडीलाले सुबुद्धी सूचली अन् आंबेडकर सायबाले शायेत घातलं, सायेबानं काही लहान सहान कमाई केली नाही. हिंदुस्थानची घटना लिहिली अन् तेच जर शायेत जाते ना, अन् शिकते ना त झाडू मारनंच त्यायच्या कर्मात होतं, विद्या मोठं धन आहे, तेवा माया अडाण्याचं ऐका रं बाप्पाय हो. पोरायले शायेत पाठवा असे म्हणून उपस्थितांकडून मुलांना शाळेत पाठवायची शपथ हे वदवून घेत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा संत गाडगे महाराजांबद्दल फार आदर व प्रेम होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे कायदामंत्री असतानाही वेळातवेळ काढून ते त्यांच्या भेटीसाठी येत असत व त्यांच्या शेजारी जमीनीवर बसून चर्चा करीत असत. संत गाडगे बाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायचे, आपण येथे येण्याचे कष्ट का घेतले बाबासाहेब? आपला प्रत्येक मिनिट महत्त्वाचा व कामाचा आहे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, बाबा माझी खुर्ची आज आहे उद्या नाही; परंतु आपला अधिकार तर अजरामर आहे ना बाबा? पंढरपूरच्या भेटीत अस्पृश्यांना विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश बंदी असलेली दिसून आली आणि ते बघून त्यांना अतिव दुःख झाले. मग त्यांनी लगेच अस्पृश्यांसाठी एक लाख रुपये खर्चुन चोखामेळा धर्मशाळा बांधून त्या धर्मशाळेचे ट्रस्टीत रुपांतर केले आणि तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाधीन केली जेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूची वार्ता संत गाडगे बाबांना कळली तेंव्हा त्यांना जोरदार धक्का बसला आणि ते फार दुःखी झाले.
गाडगेबाबांनी हाता खराटा घेऊन अक्षरशः ५० वर्षे जिवंत असेपर्यंत संपूर्ण गाव, खेड्यातील रस्ते, गटारे झाडून साफ केली आणि समाजातील जनतेचे आरोग्य चांगले राखून दीर्घकाळ सेवा केली. सकाळ, संध्याकाळ सारा गाव खराट्याने झाडून स्वच्छ करायचे आणि रात्रीला कीर्तनाद्वारे अज्ञानी जनतेला बोधामृत पाजायचे. असे महान संत आपणांस क्वचितच पहावयास मिळतील. त्यांनी आपला संपूर्ण समाज स्वतःच्या कुटुंबासारखा हे विश्वाची माझे घर याप्रमाणे वाटत होता. त्यांनी समाजाची सेवा करीत करीतच आपला देह आयुष्यभर चंदनासारखा झिजवला. हल्लीचे साधु-संत करोडपती आहेत ते व्यावसायिक साधु-संत बनले असून जनतेची सेवा न करता देवाष-धर्माच्या नावाने जनतेला सर्रास लुटून अमाप संपत्ती गोळा करतात आणि अनेक काळे धंदे करुन चैनीचे जीवन जगतात.
गाडगेबाबांनी मात्र जे रंजले-गांजले, दीन, दुबळे, दुःखी कष्टी, अनाथ, रोगी, महारोगी, निराधार पोरकी लेकरे यांची बाबांनी अहोरात्र सेवा केली. त्यांचा धर्म हा खर्या अर्थाने मानवधर्म होता. त्यांनी कधी देवाची मंदिरे, साधु-संतांचे आश्रम, मठ बांधले नाहीत. कुणाकडे पैशाकरीता हात पसरला नाही. गायी, वासरे, जनावरांसाठी गोरक्षणे थाटली, पीडीतांसाठी त्यांनी सदावर्ते सुरुवात केली. महारोग्यांसाठी कुष्ठधाम बांधलेत. निराधार आश्रम, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, वृद्धाश्रम, पाळणाघर उभे केलेत. यात्रेच्या ठिकाणी भक्तांच्या सोयीसाठी घाट आणि धर्मशाळा बांधल्या. सन १९५२ साली गाडगे महाराज मिशनची स्थापना झाली आणि तिचा विस्तार महाराष्ट्रभर झाला. मिशनतर्फे चालविल्या जाणार्या शैक्षणिक संस्थांमधून हजारो विद्यार्थी लाभ घेताहेत. जे सुशिक्षीतांना जमले नाही ते एका अशिक्षित परिवर्तनवाद्याने करुन दाखविले आहे. आज भारत सरकारला स्वच्छ भारत अभियान राबवावे लागत आहे. महाराष्ट्र शासनानेही संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविले. हा केवळ गाडगेबाबांच्या कार्याचा परिपाक होय.
असा हा महान संत नागरवाडीवरुन गाडीतून अमरावतीकडे जात असताना बलगावच्या पेढी नदीच्या तीरावर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या नामोच्चाराने २० डिसेंबर १९५६ रोजी निवर्तला. या थोर महात्म्याचा देह असा अनंतात विलीन झाला, तेंव्हा उभा महाराष्ट्र हळहळला.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0